पुणे – आजच्या जीवनशैलीचा लोकांच्या जीवनावर वाईट परिणाम झाला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लोक अशा अनेक चुकीच्या कामांमध्ये गुंतलेले असतात, ज्यामुळे त्यांच्या मेंदू आणि शरीरावर परिणाम होतो. आरोग्यासंबंधी अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. या चुकीच्या क्रियाकलापांपैकी एक म्हणजे फोनचे व्यसन. लोक त्यांच्या मोबाईल फोनशी इतके जोडले गेले आहेत की त्यांना सकाळी सर्वात आधी त्यांचा फोन तपासावा लागतो.
वारंवार फोन चेक करण्याची सवय त्यांच्या मेंदूवर वाईट परिणाम करू शकते. सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीने वारंवार स्मार्टफोन तपासल्याने मेंदूवर होणाऱ्या परिणामांवर संशोधन केले. संशोधनात असे आढळून आले की सर्व वयोगटातील लोकांचा स्क्रीन टाइम वाढत आहे आणि फोन वारंवार तपासणे देखील तितकेच धोकादायक ठरत आहे.
* आयफोन वापरकर्त्यांवर संशोधन
ब्रिटीश जर्नल ऑफ सायकॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिसर्च रिपोर्टनुसार, फोन वारंवार चेक केल्याने दैनंदिन जीवनातील लहान समस्या सोडवण्याची क्षमता कमी होऊ शकते. फोन तपासण्याच्या सवयीमुळे समस्या सोडवण्याची वृत्ती कमकुवत होऊ शकते.
* स्मार्टफोन सतत तपासल्याने लक्ष केंद्रित करणे कठीण
अभ्यासात असे आढळून आले की, लोक छोट्या समस्यांपासून लक्ष हटवण्यासाठी फोनचा वापर करू लागले आहेत. त्यांना कंटाळा कमी करायचा असेल किंवा टाइमपास करायचा असेल, ते त्यांच्या स्मार्टफोनमध्ये बिझी होतात. त्यामुळे त्यांचे मेंदूवरील नियंत्रण कमी होत असून, काम अपूर्ण सोडणे, विचलित होणे अशी परिस्थिती वाढू लागली आहे. स्मार्टफोन वापरण्याच्या सवयीमुळे लोक बोलत असताना शब्द विसरायला लागतात.
* बोलत असताना शब्द विसरतात
या संशोधनाचे मुख्य संशोधक आंद्रे हार्टांतो यांच्या मते, स्मार्टफोनमुळे जरी काही कामे सोपी झाली असली तरी आता लोकांना नकळतपणे गरज नसतानाही स्मार्टफोन तपासण्याची सवय लागली आहे. विद्यापीठाने अभ्यासासाठी आयफोन वापरकर्त्यांची निवड केली. हे लोक मोबाईल वापरण्याच्या पद्धती, वेळ आणि किती वेळा मोबाईल वापरतात याचा तपास करण्यात आला.
आठवडाभर अॅपच्या माध्यमातून त्याच्या मोबाईलवर नजर ठेवण्यात आली आणि असे आढळून आले की, जे लोक वारंवार फोन तपासतात त्यांची अनेक कामे अपूर्ण राहतात. याचं कारण म्हणजे त्यांचा फोकस नसणं. अशा लोकांना संभाषणादरम्यान योग्य शब्द वापरता येत नाहीत, कारण ते बोलत असताना शब्द विसरतात.
* मुलांमध्ये मायोपियाचा धोका
याशिवाय स्मार्टफोनच्या वापरामुळे मुलांमध्ये मायोपियाचा धोकाही वाढतो. जर्नल ऑफ मेडिकल इंटरनेट रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, जगभरातील 5 ते 8 वयोगटातील 49.8 टक्के मुले स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मायोपियाला बळी पडू शकतात. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे दृष्टी कमी होणे आणि अस्थिनोपियासारखे आजारही होऊ शकतात.