एकरकमी शुल्क आकारू नका : विद्यापीठाचे आदेश
पुणे – करोना प्रादुर्भावामुळे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून एकरकमी शुल्क आकारू नका. त्यांना शुल्क भरण्यास पर्याय उपलब्ध करून द्या, असे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिले आहेत.
करोना परिस्थितीमुळे पालक व विद्यार्थी आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत प्रवेशित विद्यार्थ्यांकडून काही संस्था एकरकमी शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी संघटनांनी केल्या होत्या. विद्यापीठाने याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने शुक्रवारी परिपत्रक प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला. करोनाचे संकट लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगानेही विद्यार्थ्यांकडून शुल्क घेताना त्यांना पर्याय देण्याचे निर्देश दिले होते.
पालकांची स्थितीचा विचार करून एकत्रित शुल्क आकारू नका, असेही यूजीसीने स्पष्ट केले आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना तसेच शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येते.
त्या पार्श्वभूमीवर ज्या अभ्यासक्रमांच्या शुल्काची प्रतिपूर्ती शासन करते, अशा अभ्यासक्रमांचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेऊ नये. तसेच ज्या अभ्यासक्रमाची शुल्काची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जात नाही, अशा अभ्यासक्रम प्रवेशित विद्यार्थ्यांकडून एकत्रित शुल्क न घेता पर्याय द्यावेत, असे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने स्पष्ट केले आहे.