राजगुरूनगर (प्रतिनिधी)- खेड तालुक्यात काल (दि. १७) एकाच दिवसात ६१ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे तालुक्याची संख्या ६१२ वर पोहचली असल्याची माहिती सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
खेड तालुक्यात करोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढत आहे. तालुक्यातील ग्रामीण सह तीन नगर परिषद हद्दीत हि संख्या वाढत असल्याने तालुक्यात धोक्याची घंटा वाजत आहे. तालुक्यात १८ गावे आणि ३ नगर परिषद कार्यक्षेत्रात मंगळवार पासून कडक लॉकडाऊन सुरु आहे. तरीही संख्या कमी होत नाही.
तालुक्याला करोनाचे हादऱ्यांमागुन हादरे बसत आहेत. गेले पंधरा दिवसांपासून तालुक्यात दररोज करोना बाधितांची संख्या वाढत आहे. काल एकाच दिवसात ६१ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडले असून तालुक्यात अनेक प्रतिष्ठित व्यक्ती करोनाची शिकार बनत असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील कडूस गावामध्ये मागील काही दिवसांपासून एकही व्यक्ती करोना बाधित व्यक्ती आढळून आलेली नाही. खेड तालुक्यात काल एकाच दिवशी आळंदी (५), चाकण (१४) मेदनकरवाडी (२), वाकी बुद्रुक (१), भोसे (६), शेलपिंपळ्गाव (२), कुरुळी (५), दावडी (१), वडगाव घेनंद (२), काळूस (१), चऱ्होली खुर्द (३), गाडकवाडी (४), कडधे (१), चव्हाणमळा (१), निमगाव (१), वाडा (२),राक्षेवाडी (१), केळगाव (२), राजगुरूनगर (३), शिरोली (३), चांडोली (१) असे ६१ जण करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.