नगर विकास विभागाकडून हिरवा कंदील; शासन स्तरावरून 28 पदांची नियुक्ती
मंचर – नव्याने स्थापन झालेल्या मंचर नगरपंचायतीचा आकृतीबंध राज्याच्या नगरविकास विभागाकडून मंजूर करून घेण्यात यश आले असून, यामुळे चालू वर्षापासून विविध विभागांसाठी 28 पदांची नियुक्ती शासन स्तरावरून करण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
पूर्वीच्या मंचर ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला मंचर नगरपंचायतीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली होती. यावेळी आढळराव पाटील यांनी मंचर नगरपंचायतीचा आकृतीबंध मंजूर व्हावा यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत आपण व्यक्तिश: याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची ग्वाही कर्मचाऱ्यांना दिली होती.
त्यानुसार केलेल्या पाठपुराला यश येऊन नगरविकास विभागाच्या निकषानुसार मंचर नगरपंचायतचा आकृतीबंध निश्चित होऊन विविध स्वरूपाची 28 अधिकारी व कर्मचारी पदे भरण्यास शासन स्तरावरून मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नगरविकास विभागाचे सर्व अधिकारी यांचे या महत्त्वपूर्ण मंजुरीबद्दल मंचर शहरवासीयांच्या वतीने आढळराव पाटील यांनी आभार व्यक्त केले.
मंचर नगरपंचायतीचा आकृतीबंध मंजूर झाल्याने शहराचा नियोजनबद्ध विकास करणे, नागरिकाची मूलभूत कामे पद्धतशीरपणे सोडविणे, शहराची स्वच्छता, आरोग्य, पाणी आदी व्यवस्थापनाची कामे वेळेत मार्गी लावणे सोयीस्कर होणार आहे. शहराच्या गरजेनुसार अधिकची पदे भरण्यासाठी भविष्यात पाठपुरावा करणार आहे. मंचर शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यशासनाकडून लोकहितोपयोगी प्रकल्प येथे उभारण्याकडे कल आहे.
– शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार
या पदांची भरती होणार
यामध्ये मुख्याधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, जलदाय-मलनिस्सारण स्वच्छता अभियांत्रिकी सेवा, नगररचनाकार व विकास सेवा, स्वच्छता निरीक्षक सेवा, प्रयोगशाळा सहाय्यक, वायरमन, व्हॉल्वमन आदी प्रत्येकी एक पदे, लेखापाल व लेखापरीक्षक दोन पदे, कर निर्धारक व प्रशासकीय सेवा तीन पदे, लिपिक टंकलेखक 7 पदे, पंप ऑपरेटर/ वीजतंत्र/जोडारी तीन जागा, शिपाई तीन जागा, मुकादम दोन जागा, याप्रमाणे पदांची भरती होणार आहे.