नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत आलेल्या येस बॅंकेवर आता प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. स्टेट बॅंकेचे माजी उप व्यवस्थापकीय संचालक प्रशांत कुमार यांची तेथे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बॅंकेच्या वित्तीय सेवा विभागाने त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केल्यानंतर आज त्यांनी तातडीने या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्यावर आता बॅंकेच्या आर्थिक व्यवस्थापनाची मोठी जबाबदारी असणार आहे.
आरबीआयने या बॅंकेला नवीन कर्ज देण्यास आणि ठेवीदारांना 50 हजारा पेक्षा अधिक रक्कम काढण्यास निर्बंध घातले आहेत. गेले अनेक महिने ही बॅंक अडचणीत आली होती. बॅंकेने दिलेली हजारो कोटी रूपयांची कर्जे बुडाल्याने बॅंक आर्थिक अडचणीत सापडली असून ही कर्जवसुल करणे हे प्रशांत कुमार यांचे पहिले प्राधान्य असेल.