‘टीईटी’साठी आठ दिवसांत अर्जांचा पाऊस

44 हजार उमेदवारांची नोंदणी


एसईबीसी व ईडब्लूएस प्रवर्गासाठी परीक्षा शुल्कात सवलत नाही

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) आठ दिवसांत तब्बल 44 हजार उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज नोंदणी केली आहे. दररोज किमान पाच हजार उमेदवार अर्ज भरत असून यात दिवसेंदिवस वाढ होणार आहे. एसईबीसी व ईडब्लूएस प्रवर्गासाठी परीक्षा शुल्कात कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे.

यानुसार शासनाच्या परवानगीने वर्षातून एकदा ही परीक्षा घेण्यात येते. 15 जुलै 2018 नंतर एकही परीक्षा झाली नाही. आता येत्या 19 जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 8 नोव्हेंबरपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना मुदत देण्यात आलेली आहे. 4 जानेवारीपासून प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेता येणार आहेत.

प्राथमिक स्तरावर इयत्ता पहिली ते पाचवी व उच्च प्राथमिक स्तरावर इयत्ता सहावी ते आठवी अशा दोन स्तरावर परीक्षा घेण्यात येणार आहे. सर्वसाधरण, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, भटक्‍या विमुक्त जाती व जमातीच्या उमेदवारांसाठी एका पेपरकरीता 500 रुपये तर दोन्ही पेपरसाठी 800 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, अंपग उमेदवारांना एका पेपरसाठी 250 रुपये तर दोन्ही पेपरसाठी 400 रुपये शुल्क भरणे आवश्‍यक आहे. पात्रता गुणांच्या बाबतीतही शासन आदेशानुसारच कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील अधीक्षक शशिकांत चिमणे यांनी दिली असून सूचनाही देखील संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या आहेत.

शुल्कात सवलत देण्याची मागणी
सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्ग (एसईबीसी) व खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्लूएस) सुमारे 250 उमेदवारांनी राज्य परीक्षा परिषदेला ई-मेल पाठविले आहेत. परीक्षा शुल्कात सवलत मिळावी, अशी मागणीही या उमेदवारांकडून करण्यात आली आहे. यावर शासन निर्णयाचा आधार घेत या उमेदवारांना परीक्षा शुल्कात सवलत देण्यात येणार नाही. त्यामुळे या उमेदवारांना खुल्या प्रवर्गातूनच अर्ज भरावे लागणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.