संगमनेर – संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारातील विशाल गार्डन हॉटेल शेजारी एका कारचालकाने सफरचंद व संत्रे घेवून जाणाऱ्या मालवाहू ट्रकला हुलकावणी दिल्याने ट्रक उलटला. बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात एकूण तेरा टन पैकी सात टन सफरचंद व दोन टन संत्र्यांचे मोठे नुकसान झाले.
ट्रक चालकही जखमी झाला आहे. मखरुनसिंग पूरणसिंग राजपूत (वय- 20, रा. दसोली सांध्र काठुवक, जम्मू-काश्मीर) चालक कंटेनर ( आरजे 14 जीके 8266) मधून तेरा टन सफरचंद व संत्रे हा माल दिल्ली येथून कोपरगाव मार्गे पुण्याला जात होता. बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास वडगावपान शिवारातील विशाल गार्डन शेजारी ट्रक आला असता त्याच दरम्यान अज्ञात कारने समोरून चालणाऱ्या ट्रकला हुलकाविणी दिली.
कार चालकाला वाचविण्याच्या नादात मालवाहू ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. यावेळी ट्रकमधील सर्व सफरचंद व संत्रे रस्त्यावर फेकल्या गेले. तेरा टन माला पैकी सात टन सफरचंद व दोन टन संत्रे असे एकूण नऊ टन मालाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. तसेच कंटेनर चालक राजपूत अपघातात जखमी झाला आहे. ट्रक उलटल्याची माहिती समजताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक आण्णासाहेब दातीर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली होती. त्रस्त्यावर सफरचंद व संत्रे पडलेल्या अवस्थेत होते.
आजूबाजुच्या नागरिकांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी ट्रक चालक मखरूनसिंग पुरणसिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी अज्ञात दोघा कार चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आण्णासाहेब दातीर करत आहेत.