पारनेरला अनधिकृत खडी क्रशर सील

पारनेर – तालुक्‍यातील पठारवाडी येथील खडी क्रशर व दगड खाणीवर पारनेरच्या तहसीलदारांनी धडक कारवाई करून सील केले आहे. आज तहसीलदार ज्योती देवरे यांनी ही कारवाई केली.

या विनापरवाना खडी क्रशरबाबत काही दिवसांपूर्वी पिंप्री जलसेन येथील सामाजिक कार्यकर्ते भानुदास साळवे यांनी महसूल विभागाकडे तक्रार केली होती. या अनधिकृत क्रशरमुळे परिसरातील शेतमालाचे, कुकडी कॅनॉल व चारी रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या क्रशरपासून 100 मीटर अंतरावर कुकडी कॅनॉल वाहत आहे. खडक फोडण्यासाठी केल्या जाणाऱ्या स्फोटांमुळे कुकडी कालव्याला तडेही गेलेले आहेत. त्यामुळे या परिसरात कॅनॉलला मोठी गळती लागली आहे. क्रशर परिसरात कालव्याला मोठा भरावा आहे. थोडे पुढे 150 फुटांपर्यंत डोंगर फोडून कालवा वाहतो आहे.

स्फोटांच्या हादरऱ्यांमुळे डीप कट अनेकदा कालव्यात ढासळलेले आहे. त्यामुळे कालवा दगडांनी अडल्यामुळे फुटुन मोठी दुर्घटना होण्यासारखी परिस्थीती निर्माण झालेली आहे. तसेच खडी व डबर यांच्या अवजड वाहतुकीमुळे कुकडी कॅनॉललचा निघोज ते जवळा असा सुमारे दहा किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खचला असून, चारी क्रमांक 2 व 3 लगत च्या रस्तांवर तीन ते चार फुटांचे खड्डे पडलेले आहेत.

परिसरातील शेतकऱ्यांच्या घरांना तडे गेले असून, खाणीतून निघालेल्या धुळीने पिकांचे नुकसान होत आहे. या परिसरात दोन खाणी असून, त्यांनी कोणताही परवाना घेतलेला नसल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांवरून दिसून येते. साळवे यांनी याबाबतची तक्रार वरिष्ठ पातळीवर केल्याने व कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा देताच आज तातडीने पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी घटनास्थळी पाहणी करून या खाणींना सील केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)