बॉलीवूड अभिनेत्री कियारा आडवाणी तिच्या आजवरच्या प्रवासाबद्दल आणि विशेषतः सरत्या वर्षाबाबत अत्यंत समाधानी आणि आनंदी आहे. ती सांगते की 2019 हे वर्ष माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचं होतं. एकामागून एक माझी सर्व स्वप्नंसत्यात उतरवत मी पुढं निघाली आहे. अर्थात, मला आणखी बरंच काही मिळवायचं आहे. पण एक गोष्ट निश्चित की माझ्या कारकिर्दीची गाडी आता सुसाट सुटण्याची सुरुवात झाली आहे. मी अत्यंत योग्य दिशेने पुढे निघाले आहे.
कियारा पुढे सांगते की, माझा प्रत्येक चित्रपट हा माझ्या करिअरमधील मैलाच्या दगडासारखाच आहे. कारण प्रत्येक चित्रपटाने मला काही ना काही तरी शिकवलं आहे. मग तो चित्रपट यशस्वी होवो अपयशी! मला त्या प्रत्येक चित्रपटावर गर्व आहे. ती म्हणते की मी माझ्या मेहनतीमध्ये कुठेही कमी करत नाही. माझ्या मते कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात कामाची भूक कधीच कमी होता कामा नये अथवा मरता कामा नये.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, यश मिळाल्यानंतर कुणीही असा विचार करता कामा नये की आता आपल्यामध्ये सुधारणांची गरज नाही. आयुष्याच्या अगदी शेवटापर्यंत सुधारणांची प्रक्रिया ही सुरु राहिली पाहिजे. कियाराचे हे विचार आणि भूमिका तिला पुढील वाटचालीसाठी नक्कीच उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा आहे.