आत्मरत म्हणजे इंग्रजीत ज्याला नार्सिसिस्ट म्हणतात ती व्यक्ती-अर्थात स्वत:वरच प्रेम करणारी व्यक्ती. आत्मरत व्यक्ती स्वत:वर प्रचंड प्रेम करतात किंवा त्या इतरांवर फारसं प्रेम करीत नाहीत-केवळ स्वत:वरच करतात. आत्मरती हे त्यांच्या गुणधर्माचं नाव-इंग्रजीत नार्सिसिझम. हा शब्द एका ग्रीक पुराणकथेवरून आला आहे. नार्सिसस हा प्राचीन ग्रीसमधील एक शिकारी होता. तो अतिशय देखणा होता. तो स्वत:वरच खूप प्रेम करायचा. त्यामुळे त्याने अनेक प्रेमाच्या याचना धुडकावून लावल्या. एकदा तो एका तळ्याकाठी आला असता त्यानं स्वत:चं देखणं रूप प्रतिबिंबात पाहिलं. स्वत:वर प्रेम करीत असल्यानं तो आपल्या देखण्या प्रतिबिंबाकडे पाहातच राहिला-अगदी मरेस्तोवर! नंतर तिथे एक रोप उगवलं आणि त्याला जे फूल आलं ते नार्सिसस नावानंच ओळखलं जाऊ लागलं.
आत्मरत व्यक्ती सहजपणे ओळखू येतात. त्या कायम आपल्याला प्रदर्शनीय (एक्झिबिशनिस्ट) स्थितीत ठेवतात. लोकांचं लक्ष या ना त्या कारणानं आपल्याकडेच केंद्रित राहील अशी व्यवस्था करतात. या व्यक्ती वारंवार आपलं रूप आरशात न्याहाळतात किंवा आपलेच नवे जुने फोटो पाहात राहतात.
आत्मरत माणसं आणि आत्ममग्न किंवा स्वलीन माणसं यांच्यात खूप फरक आहे. आत्ममग्न व्यक्ती (विशेषत: मुलं) आपल्या कृतींमध्येच मग्न असतात. आत्ममग्न व्यक्तींना इंग्रजीत ऑटिस्टिक अशी संज्ञा आहे. त्यांचं दुसऱ्या माणसांकडे लक्ष जात नाही आणि गेलंच तर ते एखाद्या निर्जीव वस्तूकडे पाहिल्यासारखं असतं. याउलट आत्मरत माणसं इतर माणसांकडे बारकाईनं पाहेत असतात आणि त्या माणसांचं आपल्याकडे लक्ष आहे की नाही याची निरंतर खात्री करून घेत असतात.
आत्मरती ही आनुवंशिक किंवा परिस्थितीजन्यही असू शकते. ज्या व्यक्तींना लहानपणी छळ सोसावा लागला आहे त्या आत्मरत होऊ शकतात. आत्मरती ही व्यक्तिमत्त्व विकृती समजली जाते. अर्थात इतर अनेक मानसिक विकारांप्रमाणे त्यांची तीव्रता कमी-अधिक असते. काही केसेसमध्ये आत्मरत व्यक्ती बलात्कार किंवा हत्येसारखे गंभीर गुन्हे करू शकतात. त्यांच्यात समवेदनेचा अभाव असतो. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, आपण सर्व जण अंशत: आत्मरत आहोत.
आपल्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे, असं आत्मरत व्यक्तींच्या ध्यानात आलं तर त्या आक्रमक आणि हिंसक होऊ शकतात. धमक्या देणे, धावून जाणे किंवा अलीकडच्या काळात समाजमाध्यमांमधून आरोप आणि निंदानालस्ती करणे, असे प्रकार त्यांच्या हातून होतात.
एव्हाना आत्मरत माणसं कशी ओळखायची हे लक्षात आलं असेलच. तज्ज्ञांच्या मते अलेक्झांडर (सिकंदर), नेपोलियन, हिटलर या ऐतिहासिक व्यक्ती आत्मरत होत्या. अलीकडच्या काळातील राजकीय नेते डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सत्ताधीश किम जोंग उन तसंच सुप्रसिद्ध नवकल्पक आणि ऍपल कंपनीचे स्टीव्ह जॉब्ज व फेसबुकचे मार्क झुकरबर्ग हे सगळे आत्मरत मंडळींत मोडतात. याखेरीज सेलेब्रिटींपैकी किम कार्दाशियान, मॅडोना आणि अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांना आत्मरत समजलं जातं.
साहजिकच आपल्याकडील कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती आत्मरत आहेत असा प्रश्न मनात येईलच. कंगना राणावत आणि हृतिक रोशन हे आत्मरत आहेत, असा आरोप केला जातो. आपल्या देशात असा उल्लेख सहसा मान्य होत नाही; परंतु जी लक्षणं सांगितली आहेत त्यावरून तुम्ही आडाखे बांधू शकता आणि अशा व्यक्ती तुमच्या लक्षात येतीलच. काही राजकीय व्यक्ती, अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते येन केन प्रकारेण सतत प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. त्या अर्थातच आत्मरत व्यक्ती आहेत. अगदी मी इथला भाई आहे असं वारंवार सांगत दहशत माजवणाऱ्या गुंडांमध्येही आत्मरतीची भावना असतेच असते.
एक आश्चर्याची बाब म्हणजे स्त्रियांपेक्षा पुरुष जास्त आत्ममग्न असतात असं समजलं जातं. वास्तविक आरशासमोर स्वत:ला न्याहाळत बसणाऱ्या स्त्रियाच जास्त असतात. पण पुरुष हे जर मोठ्या प्रमाणात आत्ममग्न असतील तर त्याचं कारण माझ्या मते वेगळं आहे. प्राचीन काळी स्त्रिला वश करून घेण्यासाठी पुरुष वेगवेगळे उपाय योजत-अगदी पण लावून तो जिंकण्यापर्यंत! तोच गुण (?) अंशत: आजच्या पुरुषांत आला असला पाहिजे. अर्थात हे माझं मत आहे. विद्वान यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.
– श्रीनिवास शारंगपाणी