सातारा – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सामूहिक विवाह सोहळा कन्यादान योजना राबवली जाते. सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह करणाऱ्या अनुसूचित जाती (नवबौद्धांसह), विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर, वंजारींसह), विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील जोडप्यांना 20 हजार रुपये आणि स्वयंसेवी सस्थांना चार हजार रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी वधु-वर महाराष्ट्राचे अधिवासी असले पाहिजेत. वधु-वर किंवा दोघांपैकी एक जण अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील असावा. वराचे वय 21 वर्षांपेक्षा आणि वधूचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे. वधु-वरांच्या प्रथम विवाहासाठी हे अनुदान देण्यात येते. योजनेचा लाभ विधवा महिलेस दुसऱ्या लग्नाकरितादेखील देण्यात येईल.
बालविवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कोणत्याही कलमाचे उल्लंघन या दाम्पत्याकडून किंवा कुटुंबाकडून झाले नसल्याचे प्रतिज्ञापत्र आणि जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. सेवाभावी संस्थांनी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याचा खर्च त्या संस्थांनी करावा किंवा पुरस्कर्ते शोधावेत. मात्र, अशा कार्यक्रमासाठी शासकीय अनुदान मिळणार नाही. सामूहिक विवाह सोहळ्यात किमान 20 दाम्पत्यांचा सहभाग आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग सातारा, डॉ. बाबासोहब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट, जुनी एमआयडीसी येथे विहीत नमुन्यात अर्ज करावेत.