आंबेगाव बु -कात्रज येथील स्व. राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील तलावातील जलपर्णी पूर्ण काढण्यात आल्यानंतर या कामाचा आढावा घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी आंबेगाव बु. परिसरातील विकासकामे तसेच प्रशासकीय अडचणींचीही पाहणी केली. माजी नगरसेवक युवराज बेलदरे यांनी याबाबत त्यांना माहिती दिली. यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून “ऑन दी स्पॉट’ माहिती घेत खासदार सुळे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना काम पूर्ण करण्याबाबतच्या सूचना केल्या.
कात्रज तलावातील जलपर्णी काढण्याचे आश्वासन येथील नागरिकांना दिल्यानंतर या कामाचा संपूर्ण पाठपुरावा खासदार सुळे करीत आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांनी कात्रज तसेच आंबेगाव बुु. नऱ्हे परिसरातील विकासकामे तसेच रेंगाळलेली कामे यांचीही माहिती घेतली. आंबेगाव बु. मधील कामांबाबत युवराज बेलदरे यांनी सुळे यांना माहिती दिली. तसेच निधी, प्रशासकीय दरंगाईमुळे रेंगाळेलेली कामेही निदर्शनास आणून दिले. यावर खासदार सुळे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
मैलायुक्त पाणी रोखण्यासाठी एसटीपी प्लॅंट, सांडपाणी वाहिनी आणि प्रलंबित कामे पूर्ण करावीत, अशा सूचनाही खासदार सुळे यांनी केल्या. यावेळी माजी नगरसेवक युवराज बेलदरे, उपायुक्त माधव जगताप व इतर मनपा अधिकारी उपस्थित होते.