पुणे – कुख्यात अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील संशयितांवर मंगळवारी आरोपी निश्चित (चार्ज फ्रेम) करण्यात आले. जिल्हा न्यायालयात प्रलंबित असलेल्या तत्काळ आणि महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीला आता काहीशी गती देण्यात आली आहे. अनलॉकनंतर आरोपी निश्चिती करण्यात आलेले हे पहिलेच प्रकरण असल्याचे समजते. भारतीय दंड संहिता कलम 302 (खून), 143,147,148, 149, 120, भारतीय हत्यार कायदा कलम 3,4 (25), (27), महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम 3(1),(i),(ii), 3(4) आदी कलमांनुसार आरोप निश्चिती करण्यात आली आहेत. न्यायाधीशांनी व्हीसीद्वारे आरोप निश्चिती केली, अशी माहिती संशियित विष्णू जाधव याचे वकील ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली.
या प्रकरणात मोक्कानुसार संतोष भीमराव शिंदे, नीलेश खंडू सोलनकर, राजेंद्र विजय गायकवाड, आकाश सुनील महाडीक, नितीन महादेव मोगल, विष्णू यशवंत जाधव, नागेश लक्ष्मण झाडकर, मनी कुमार चंद्रा ऊर्फ अण्णा, विकास प्रभाकर यादव, गोरख बबन कानकाटे, अण्णा ऊर्फ बबड्या किसन गवारी, प्रमोद ऊर्फ बापू काळुराम कांचन, सोमनाथ काळुराम कांचन, रवींद्र शंकर गायकवाड, प्रवीण मारुती कुंजीर यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहे. विष्णू जाधव याचे वकील ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. लोंढे याचा भविष्यात जामिनास, वाळूच्या व्यवहारात आणि इतर धंद्यांत अडसर होऊ नये म्हणून आरोपींनी त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष मोक्का न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.
याबाबत वैभव प्रकाश ऊर्फ अप्पा लोंढे (वय 22, उरुळीकांचन, हवेली) यांने लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिली आहे. 28 मे 2015 रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना लोंढेचा खून करण्यात आला होता.