आणखी 350 जण करोना पॉझिटिव्ह आढळले
पुणे – शहरातील करोना बाधितांच्या वाढत्या संख्येबरोबर अत्यवस्थ बाधितांची संख्या 265 पर्यंत पोहचली आहे. त्यामध्ये 53 जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात नव्याने 350 बाधित सापडले असून, बाधितांची एकूण संख्या 11 हजार 465 वर गेली आहे. तर गेल्या 24 तासांत करोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी तब्बल 2, 464 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. त्यातील जवळपास दोन हजारांहून अधिक नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यामध्ये 350 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तपासणीची संख्या वाढल्यामुळे मागील दोन दिवसांपासून बाधितांची दररोजची संख्या 300 च्या पुढे आहे. आज नव्याने आणखी 2,676 जणांची नमुने घेण्यात आले असून, पुढील 24 तासांत त्याचा अहवाल प्राप्त होईल.
दरम्यान, सध्या शहरात 3,909 व्यक्तींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर, क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तींची संख्याही आता 10 हजारांच्या पुढे गेली आहे.