उर्वरित संशयितांना अर्धा तासात घरी सोडले
पुणे – महापालिकेकडून शहरात सोमवारपासून रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट सुरू करण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशीच्या 264 चाचण्यांमध्ये 27 जणांना करोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उर्वरित 237 जणांना लगेच घरी सोडण्यात आले. मात्र, त्यानंतरही पुढील 10 दिवस या संशयित नागरिकांना घरीच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात महापालिकेकडून दररोज 500 रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट टेस्ट करण्याचे नियोजन आहे. करोनाबाधितांचा वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून तब्बल 1 लाख ऍन्टिजेन टेस्ट किट खरेदी करण्यात आली आहे. यामुळे अवघ्या अर्धा तासात संशयित व्यक्तीला करोना झाला आहे, किंवा नाही हे समजणार आहे.
परिणामी, महापालिकेस निगेटिव्ह अहवाल आलेल्या नागरिकांना घरी सोडता येणार असून महापालिकेच्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रांवर येणारा ताण कमी आहे. पहिल्या टप्प्यात पाच केंद्रांवर या चाचण्या केल्या जाणार आहेत.