शिक्रापूर (प्रतिनिधी) – शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सहा जुलै रोजी एका नामांकित कंपनीतील कामगार करोना बाधित असल्याचे आढळून आलेले असताना आता पुन्हा दुसऱ्या दिवशी देखील त्याच कंपनीतील एका कामगाराला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील एका नामांकित कंपनी कामगाराला सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्याने त्याने शिक्रापूर येथील दोन हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले असता तेथील डॉक्टरांनी त्याला कोरोना तपासणी करण्याचा सल्ला दिला असताना सदर इसमाची करोना तपासणी केल्यानंतर त्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह येत त्या इसमाला कोरोनाची बाधा झाल्याचे सहा जुलै रोजी समोर आले होते, त्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने सदर रुग्णाच्या संपर्कात असलेल्या त्याच्या आई, पत्नी, भाऊ, भावाची पत्नी यांच्या तपासणी करण्यासाठी स्वॅब घेण्यात आले होते. सदर रुग्ण आढळून आल्यानंतर त्या रूग्णाबाबत खबरदारीच्या उपाययोजना सुरु असतानाच आज ६ जुलै रोजी त्याच कंपनीतील दुसऱ्या कामगाराचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
सदर रुग्णाला सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्याने त्याने सणसवाडी येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. तेथील डॉक्टरांना त्याच्याबाबत शंका आल्याने त्यांनी त्याची कोरोना तपासणी केली असता त्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यांनतर आरोग्य विभागाच्या वतीने सदर रुग्ण काम करत असलेल्या कंपनी, रुग्ण दाखल असलेले हॉस्पिटल तसेच त्याच्या घराजवळील परिसरात किती लोक त्याच्या सानिध्यात आले याची चौकशी सुरु आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करून त्यांची देखील तपासणी करणार असल्याचे असल्याचे आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे यांनी सांगितले. मात्र काही दिवस करोनापासून मुक्ती मिळाल्याने शिक्रापूर व परिसरातील नागरिक समाधानी असताना आता पुन्हा एकामागून एक करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने शिक्रापूरसह परिसर हादरून गेला आहे.