( शिक्रापूर ) प्रतिनिधी : शिक्रापूर ता. शिरूर सह आजूबाजूच्या गावांमध्ये या आठवडाभरात अनेक कोरोनाचे रुग्ण आढळून आले असल्यामुळे तसेच रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शिक्रापूर गाव संपूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय गावातील काही मोजक्या व्यापाऱ्यांनी घेतला असून शिक्रापूर पुढील चौदा दिवस लॉकडाऊन राहणार आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथे आठवडाभरात सात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले तर आजूबाजूच्या देखील अनेक गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामध्ये भाजीपाला संबंधित जास्त व्यक्तींचा समावेश आहे, तर दररोज कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने शिक्रापूर येथील काही व्यापारी व पदाधिकारी यांनी बैठक घेतली. यावेळी शिक्रापूरचे माजी सरपंच रामराव सासवडे, व्यापारी असोशियनचे अध्यक्ष अशोक शहाणे, लद्धाराम पटेल, संजय नरके, लाला गदादे, दिलीप कोठावळे, भगवान पडवळ, संजय भांबुर्डेकर, विजय लोखंडे, प्रशांत सासवडे, निवृत्ती काळोखे, दत्तात्रय राऊत, ज्ञानेश्वर शहाणे, संपत चव्हाण, दत्तात्रय भुजबळ, श्रीकांत विरोळे यांसह आदी उपस्थित होते.
यावेळी गावामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे खबरदारी म्हणून गावातील सर्व व्यवहारे पुढील चौदा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर बैठकीनंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना भेटून गावातील सर्व व्यवहारे बंद करून पुढील चौदा दिवस गाव लॉकडाऊन करत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक किरण भालेराव, पोलीस नाईक ब्रम्हा पोवार, केदार शितोळे हे उपस्थित होते, यावेळी गावामध्ये खबरदारीच्या उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याचे सांगत शिक्रापूर मधील व्यापारीव पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.
लॉकडाऊन करताय मग आमचे काय ?
राज्यभरात लॉकडाऊन झाल्यापासून सर्व नाभिक व्यावसायिकांनी शासनाचा निर्णय होई पर्यंत बंद पाळला होता, त्यांनतर असंख्य नाभिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती, तर नुकताच नाभिक व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी दिली होती, त्यांनतर नाभिक व्यावसायिकांनी हजारो रुपये खर्च करून दुकानामध्ये खबरदारीच्या उपाययोजने साठीच्या वस्तू खरेदी केल्या, त्यांनतर लगेचच गावामध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे लॉकडाऊन करताय मग आमचे काय असा सवाल नाभिक व्यावसायिकांनी केला आहे.
गावामध्ये मोजकेच व्यापारी आहे कि काय ?
शिक्रापूर ता. शिरूर गावामध्ये एक हजार हून अधिक व्यापारी असताना गावामध्ये व्यापाऱ्यांची बैठक असल्यास मोजकेच व्यापारी व व्यावसायिक उपस्थित असतात, त्या बैठकीमध्ये घेण्यात येणाऱ्या निर्णयाबाबत काही व्यावसायिकांना काहीच माहिती नसते त्यामुळे गावामध्ये मोजकेच व्यावसायिक आहेत का असा सवाल अन्य व्यापारी व व्यावसायिकांना पडला आहे.