सचोटी आणि विश्‍वासाचे दुसरे नाव अंबिका अलंकार

पुणे- आजच्या घडीला आंबेगाव तालुक्‍यात सचोटीने व्यवसाय करणारे आणि ग्राहकांचा विश्‍वास संपादन केलेले सराफ म्हणून मंचरचे अंबिका अलंकारचे सुनील शहाणे यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. आज अंबिका अलंकार ग्राहकांच्या विश्‍वासाच्या कसोटीला खऱ्या अर्थाने उतरले आहे. त्यांच्या या वाटचालीत वडील धोंडूशेठ आणि पत्नी सौ. रूपाली यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यांच्या प्रेरणादायी वाटचालीविषयी सुनील शहाणे यांच्या शब्दांत…

आमचे मूळ गाव जुन्नर तालुक्‍यातील निमगाव सावा. वडील धोंडूशेठ शहाणे. 1949 मध्ये अंगावरील कपड्यानिशी मंचरमध्ये आले. त्यावेळी पाच रुपये भाड्याच्या खोलीत राहात असे. ते उत्तम कारागीर आहेत. आजही वयाच्या 88व्या वर्षी ते विविध प्रकारचे दागिने यामध्ये पुतळ्या, चितांग, देव, गाठे आणि चांदीचे गोठ बनवतात. त्याकाळी त्यांच्याकडे भांडवल नसायचे; मग ते ग्राहकास समोर बसून दागिने करून देण्याचे काम करू लागले. मी वडिलांच्या हाताखाली चांदीचे काम शिकलो. चांगली समज आल्यावर मला मण्यांचे काम शिकायला दोन वर्षासाठी पुण्याला पाठवण्याचा निर्णय वडिलांनी घेतला.

वडिलांनी एकदा निर्णय घेतल्यानंतर दुसरे कोणी काही बोलत नसत. दुसऱ्याच्या दुकानात बिनपगारी काम शिकायला मी पुण्याला गेलो. दारूवाला पुलाशेजारी नंदूशेठ चिनकटे यांच्याकडे मी सोन्याचे मणी बनवायचे काम शिकलो. त्यावेळी मी एकटाच पुण्यात राहात होतो. मोठे बंधू कैलास शहाणे तेसुद्धा कामात खूप हुशार. ते मला पुण्याला भेटायला येत असत. अनेकदा ते येईपर्यंत मला खर्च करायला पैसे नसायचे. त्यावेळी वडापाव खाऊन दिवस काढायचे; अर्थातच मला नंतरच्या काळात खूप फायदा झाला आणि आजही होत आहे.

कष्टाचे दिवस –
आमचे पूर्वीचे दुकान मंचरमधील इंडिया क्‍लॉथसमोर बाजारपेठेत होते. पुण्याहून काम शिकून आल्यानंतर लग्न झाले. लग्न झाल्यानंतर व्यावसायिकतेची खरी सुरुवात झाली. मी रिपेअरिंग करणारा सोनार. इतर सोनाराचे देव आणि इतर काही कामे करू लागलो. दहा रुपयाला एक देव छापून देत होतो. तेव्हा जुन्या काळी मशिनरी नव्हती, आता आली. तेव्हा सगळी कामे हातानेच करावी लागत होती. कायम भांडवलाचा प्रश्‍न भेडसावत असल्याने कौशल्य असूनही पुढे कसे जायचे, हा प्रश्‍न नेहमी सतावत होता. वडिलांप्रमाणे मीदेखील ग्राहकांची कामे समोर बसून करून द्यायचो. रात्री दोन-तीन वाजेपर्यंत काम करायचो. कष्ट करायची तयारी होती, कष्टाला मागे हटायचे नाही असा निर्धार केला होता आणि आजही तो कायम आहे. त्यावेळी रात्री उशिरापर्यंत काम करत होतो. जवळपास दहा वर्षे मी सगळी आव्हाने झेलत वाटचाल करत होतो. अर्थात, या प्रतिकूल काळात पत्नी रूपालीची मला खूप मोलाची साथ मिळाली.

नवे वळण –
परिस्थितीशी झुंज सुरू असताना माझ्या आयुष्याला नवे वळण दिले ते खादी ग्रामोद्योग मंडळाने. 2006-07 मध्ये अडीच लाख रुपये कर्ज मला या संस्थेने दिले. त्यावेळी सोन्याचा भाव फक्त सात हजार रुपये तोळा होता. पुण्यातील माझे मार्गदर्शक गिरीशशेठ सोलंकी आणि महेंद्रशेठ सोलंकी या दोघा भावांनी मला मोलाचे पाठबळ दिले आणि व्यवसायासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. सोलंकी आणि वडिलांची ओळख होती, तेवढ्यावर ते मला पाहिजे तेवढा माल देत असत. मग मोठा हुरूप आला आणि आणखी जोमाने कष्ट करू लागलो. सोन्याचे बारा स्ट्रे तयार झाले. पत्नीची इच्छा होती की आपला व्यवसाय वाढला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. आहे त्यापेक्षा मोठे शोरूम व्हावे, मी म्हणायचं एवढे शक्‍य होणार नाही पण तिची जिद्द कायम होती. पुन्हा एकदा माझ्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळ धावून आले. 2009मध्ये खादी ग्रामोद्योग संस्थेने पुन्हा मला पाच लाख रुपयांचे कर्ज दिले. त्यामुळे आमच्या दोघांचा उत्साह आणखी वाढला. मी तेवढ्या पैशात आणखी नवीन माल खरेदी केला. नवी शोरूम तयार केली. तिथून खरी शोरूमची सुरुवात झाली. तेव्हापासून ग्राहकांची संख्या कायम वाढत राहिली. ग्राहकांच्या मनात विश्‍वास वाढत गेला आणि ग्राहक पुन्हा पुन्हा खरेदीसाठी अंबिका अलंकारमध्ये येऊ लागले.

मुंबईतील प्रदर्शनामध्ये सहभाग –
खादी ग्रामोद्योग महामंडळाकडून पाच लाख रुपयांचे कर्ज मिळाले होते. विविध कलाकुसरीचे दागिने बनवले. त्याचवेळी खादी ग्रामोद्योगचे मोठे प्रदर्शन मुंबईतील ओबेराय हॉटेलमध्ये भरले होते. तेथे सहभागाची मला संधी मिळाली. आम्ही बनवलेले देव आणि गाठा त्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरली. लिज्जतसारखे पंचवीस लाखांचे मोठे प्रकल्प प्रदर्शनात सहभागी झाले होते. सगळ्यात कमी म्हणजे माझा पाच लाखांचा प्रकल्प सहभागी झाला होता. खादी ग्रामोद्योगने दिलेल्या कर्जाचा उपयोग अंबिका अलंकार योग्यप्रकारे कसा केला, याचे सादरीकरण तेथे केले. एकूणच काय तर खादी ग्रामोद्योगने आम्हाला केवळ भांडवल पुरवले नाही तर व्यवसाय कसा करायचा, तेही शिकवले. व्यवसायाचे प्रशिक्षणसुद्धा दिले म्हणून आम्हा पती-पत्नीची जडणघडण चांगल्या प्रकारे झाली.

2020 च्या नूतनीकरणानंतर –
नूतनीकरण केल्यानंतर ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यात ग्राहकांची मिळालेली साथ आणि विश्‍वास यातून अंबिका अलंकारच्या ग्राहकांमध्ये मोठी वाढ झाली. नूतनीकरणानंतर दुकानात दागिन्यांच्या नवनवीन व्हरायटीदेखील आल्या. विशेषकरून टेंपल दागिने व कलकत्ता डिझाइनचे दागिने यात प्रामुख्याने गंठण, नेकलेस, राणीहार, चॉकर, कोइमतूर झुबा, लॉंग नेकलेस, हॉलो चैन, ब्रेसलेट, अंगठ्या, पेंडंट यांसारख्या अत्याधुनिक प्रकारचे डिझाइन की, ज्या आताच्या नवीन पिढीचे खास आकर्षण ठरत आहेत असा मोठा बदल या 2020मध्ये नूतनीकरण केलेल्या शोरूममध्ये केला.

देवीचा मुखवट्याचे काम –
भराडी येथील मंदिरातील भराडमाऊलीचा मुखवटा बनवण्याचे दैवी काम मला मिळाले. आधी ड्रॉइंग काढून दिले होते; हुबेहूब झाला तरच पैसे द्यायचे असे ठरले. अंतिम मुखवटा पाहून गावकरी आनंदी आणि समाधानी झाले. त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात आमचा सपत्निक सत्कार केला. सामाजिक कामे, मंदिराचे कामे, महाप्रसादाचा कार्यक्रम यासाठी अंबिका अलंकार कायम मदतीचा हात देत असते. थोरांदळे, रांजणी, पिंपळगाव, बेलसरवाडी, खडकी येथील विविध उपक्रमांमध्ये अंबिका अलंकारचा नेहमीच सहभाग राहिला आहे. भविष्यात अनाथाश्रम, वृद्धाश्रम यासाठी मदत करण्याची योजना आहे.

सहचारिणीची भक्‍कम साथ –
सुनील शहाणे यांच्या वाटचालीमध्ये पत्नी सौ. रूपाली यांची कायम साथ राहिली. त्या त्यांच्या बरोबरीने उभ्या राहिल्या. त्या म्हणतात खादी ग्रामोद्योग मंडळ केवळ कर्ज देत नाही तर व्यवसायासाठी प्रशिक्षण सुद्धा देतात. त्यामुळे ग्राहकासमोर बोलताना आत्मविशास वाढतो. आता माझ्या दुकानात येणारे ग्राहक कधीही रिकाम्या हाताने परतत नाहीत.

ग्राहकांचे ऋण –
या सगळ्या वाटचालीत ग्राहकांनी कायम आमच्यावर विश्‍वास ठेवला त्याबद्दल मी कायम त्याच्या ऋणात आहे. आमच्या ग्राहकांनी आजपर्यंत प्रवासात साथ दिली आणि या पुढील काळात सुद्धा देत राहतील असा विश्‍वास आहे. व्यावसायिक प्रवासात दुकानातील सहकाऱ्यांनी कायम साथ दिली. लहानपणापासून आमच्याकडे असणाऱ्या विशाल शेळके, दोघांच्याही बरोबरीने सतत आमच्याबरोबर राहिला. आज दुकानातील ग्राहकांच्या गर्दीत तो ग्राहकांना काय पाहिजे, ते सहज ओळखतो. विशाल शेळके, श्रद्धा शिंदे, सागर असवले, काजल लोखंडे हे सर्व मिळून दुकान चालवताना साथ देतात. कारागीर पलश पत्रा पाच वर्षांपासून आमच्याकडे काम करत आहे. माझे व्यावसायिक सूत्र म्हणजे स्वतःला झळ लागली तरी चालेल; पण ग्राहकांची कधीही फसवणूक करायची नाही; त्यामुळे आजपर्यंत ग्राहकांचा अंबिका अलंकारवर विश्‍वास आहे

ज्या कॅरेटचे सोने त्याच कॅरेटचा भाव सोने ऑफर संकल्पना ग्रामीण भागात प्रथमच मी पुन्हा एक नवीन संकल्पना “अंबिका अंलकार’मध्ये आणली. ती म्हणजे “सोने ऑफर’. ज्या कॅरेटचे सोने, त्याच कॅरेटचा भाव म्हणजे उदा. 24 कॅरेटचा ऑनलाइन बाजारभाव 50 हजार रुपये असेल तर 916 इखड हॉलमार्किंग सोने भाव हा 46 हजार रुपये असेल. इखड प्रमाणित सरकारमान्य 916 हॉलमार्क दागिने ज्यामध्ये आमच्याकडे खरेदी केलेले हॉलमार्क दागिने पुन्हा आमच्याकडे घडामोड करताना सोने वजनात अगर सोने भावात कुठलीही घट कापली जाणार नाही. म्हणजेच जो भाव नवीनचा तोच भाव जुन्याचा असणार. फक्‍त मजुरी आणि जीएसटी द्यायची. तसेच आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे 100% हॉलमार्किंग ज्वेलरी, प्रत्येक दागिन्यांवर हॉलमार्किंग पासिंग मिळणार. आतापर्यंत ग्राहकांनी जी साथ दिल्याबद्दल आणि यापुढेही ग्राहक साथ देत राहतील याबद्दल शतशः आभार, मी त्यांचा ऋणी आहे. शुद्धतेची पक्‍की गॅरंटी म्हणजेच अंबिका अलंकार!

ग्राहक देवो भव –
नवीन शोरूम सुरू केली आणि त्या दिवसापासून ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळत गेला. ग्राहकांच्या विश्‍वासाला कधीही बाधा आली नाही. विश्‍वास कायम वाढत गेला. मला 2015 मध्ये हॉलमार्किंग लायसन्स मिळाले. ग्राहकांनी हॉलमार्क सोने कसे घ्यावे, याबाबत जागृती केली. आमच्याकडे खरेदी केलेले इखड प्रमाणित सरकारमान्य 916 हॉलमार्क दागिने पुन्हा आमच्याकडे घडामोड करताना घट कापली जात नाही. ही योजना पहिल्यांदा मंचरमध्ये अंबिका अलंकारने आणली. प्रत्येक सराफाला गहाणवट करताना सावकारी लायसन्स लागते.

मी गोल्ड लोन व्हॅल्युअर असल्याने सराफ दुकानात गहाणवट ठेवण्याऐवजी ग्राहकांचे डाग पतसंस्थेत ठेवले तर सरळ व्याजाने कर्ज मिळणार, त्यामुळे ग्राहकांचा अंबिका अलंकारमध्ये येण्याचा कल वाढला. माझ्याकडील सगळे ग्राहक पतसंस्थेत जातात. खासगीकडे कोणी जात नाही, त्याचा फायदा दुकानाला झाला. ग्राहकांच्या घरातील कोणी आजारी असेल आणि त्यावेळी पतसंस्था बंद असेल तर अंबिका अलंकारमधून ग्राहकाला उपचारासाठी पैसे दिले जातात. दुसऱ्या दिवशी ग्राहक पतसंस्थेतून पैसे काढून आणून देतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.