माजी खासदार आढळराव पाटील यांची माहिती
मंचर (पुणे) – मंचर ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर होऊन मंचर शहर नगर पंचायत स्थापन करण्याच्या प्रस्तावावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सही करून मंजुरी दिली असून येत्या तीन ते चार दिवसांत मुंबई येथे मंचर नगर पंचायतीची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. दरम्यान, मावळमधील वडगाव नगर पंचायत असून मंचरच्या रुपाने आता पुणे जिल्ह्यात दुसरी नगर पंचायत स्थापन होणार आहे.
आढळराव पाटील म्हणाले की, मंचर शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असून लोकसंख्या अंदाजे 90 हजार 357 इतकी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर व्हावे, अशी ग्रामस्थांची आणि मंचर ग्रामपंचायतीची 2013 पासूनची मागणी सुरू होती. याकामी आपण शिवसेना शिष्टमंडळासमवेत मंत्रालय, मुंबई येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांची वेळोवेळी भेट घेऊन सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. मागील आठवड्यामध्ये मंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते देविदास दरेकर, मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे, सुनील बाणखेले आदींसह संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी मंचर नगर पंचायतीचा प्रस्ताव दोन दिवसांत मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचना मंत्री शिंदे यांनी खात्याचे उपसचिव सतीश मोघे यांना दिल्या. त्यानुसार या प्रस्तावावर मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि. 2) स्वाक्षरी करून तसेच याबाबत दूरध्वनी करून मंचरकरांसाठी आनंदाची बातमी कळविली. पुढील तीन ते चार दिवसातील सोयीची वेळ निश्चित करून मुंबई येथे पत्रकार परिषदेद्वारे मंचर नगर पंचायतीची घोषणा करणार असल्याचेही मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याचे आढळराव पाटील यांनी नमूद केले.
मंचर नगर पंचायत प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून परिपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर झाल्यानंतर जानेवारी 2020 मध्ये तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. याठिकाणी नगर पंचायत आवश्यक होणे गरजेचे आहे याचे महत्त्व त्यांना पटवून दिले. त्यानंतर या प्रस्तावास जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी अनुकूलता दर्शवत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 30 जानेवारी 2020 रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावावर विभागीय आयुक्त यांनीही तात्काळ सहमती दर्शवत हा प्रस्ताव राज्याचे नगरविकास प्रधान सचिव यांच्याकडे 17 फेब्रुवारी 2020 रोजी मंजुरीसाठी सादर केला. त्यानंतर आढळराव पाटील यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवांची भेट घेतली असता केंद्र शासनाने 2021 च्या जनगणनेपर्यंत नगरपंचायत व नगर परिषद स्थापन करण्याबाबतच्या प्रस्तावांना स्थगिती दिल्याची माहिती दिली. मात्र, पुढील काही महिन्यांतच ही स्थगिती उठल्यानंतर पुन्हा मंत्री एकनाथ शिंदे यांची ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात भेट घेतली. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येऊन नगर पंचायतीचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना मंत्री शिंदे यांनी दिल्या.
- मंचरकरांचा आर्थिक स्तर उंचावणार
मंचर नगरपंचायत स्थापन करण्यास मंजुरी मिळाल्याने व्यक्तिशः मला अतिशय आनंद झाला असून नगर पंचायतीच्या माध्यमातून यापुढील काळात शहराच्या पायाभूत व सर्वांगीण विकासाला चालना मिळून नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. मंचर नगर पंचायतीला मंजुरी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच मंचर ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अभिनंदन केले.