पुणे – राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. आयोगाच्या बैठकीमधील वैचारिक मतभेदामुळे व्याथित होवून, सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे हाके यांनी म्हटले आहे. महिनाभरात आयोगातील तीन जणांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगाला पत्र पाठवून मराठा समाजाचे सामाजिक मागसलेपण सिद्ध करण्याबाबत अभ्यास सुरू करण्यासंदर्भात पत्र पाठविले. त्यानुसार आयोगाने काम सुरू केले आहे. आयोगाचे पुण्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. कामाचा व्याप लक्षात घेता आयोगात काम करणे शक्य नसल्याचे सांगत प्रा. डॉ. संजीव सोनावणे यांनी राजीनामा दिला.
त्यानंतर मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत सर्व समाजांचे सर्वेक्षण करण्याच्या मागणीवरून मतभेद झाल्याने ॲड. बालाजी किल्लारीकर यांनी राजीनामा दिला होता. आता हाके यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना हाके यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्य मागासवर्ग आयोग या पदावर जून 2022 पासून कार्यरत असून, 1 डिसेंबर 2023 रोजी आयोगाच्या बैठकीमधील माझ्या व आयोगाच्या वैचारिक मतभेदामुळे व्याथित होवून, सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.