कोरेगाव – दिव्यांग बांधवांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळावे. विविध शासकीय योजना आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. वेगवेगळ्या क्षेत्रांत वेगवेगळी संधी शोधावी. पालकांनी आपल्या दिव्यांग बालकांमधील क्षमता ओळखाव्यात आणि त्यानुसार त्यांना प्रोत्साहन द्यावे. संपूर्ण प्रशासन त्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही कोरेगाव पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी किशोर माने यांनी दिली.
कोरेगाव पंचायत समिती सभागृहात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त रविवारी दिव्यांग लाभार्थींचा मेळावा झाला. त्यावेळी लाभार्थ्यांशी संवाद साधताना माने बोलत होते. दिव्यांग विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक मीनल गोळविलकर, डॉ. रोहित बर्गे, दिव्यांग संघटनेचे कृष्णा शिंदे, राहुल कदम यांच्यासह प्रशासकीय खातेप्रमुख उपस्थित होते.
दिव्यांग दिनाची पार्श्वभूमी आणि केंद्र पुरस्कृत योजनांची समावेशित शिक्षण अंतर्गत माहिती मीनल गोळविलकर यांनी दिली. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर दिले जाणारे आर्थिक लाभ आणि साहित्य साधने वाटप संदर्भात समावेशित विभागातील शिक्षक निलेश साळुंखे यांनी माहिती दिली. दिव्यांगांचे प्रकार व लक्षणे याबाबत माहिती डॉ. रोहित बर्गे यांनी दिली. दिव्यांगांच्या चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. सर्वांना प्रमाणपत्रे देण्यात आली. उत्कृष्ट वक्तृत्व केल्याबद्दल दिव्यांग बंधू सचिन पुणतांबे यांना पारितोषिक देण्यात आले.