-->

‘राधे’, ‘लालसिंग चढ्ढा’सह 49 चित्रपट चालू वर्षी होणार प्रदर्शित; पहा यादी

मुंबई – चालू वर्षात नामांकित सेलिब्रिटीचा दर आठवड्याला किमान एक नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 2020 या वर्षात चित्रपटगृहे जवळपास बंद राहिली. आता करोनाविषयक सर्व काळजी घेऊन देशातील चित्रपटगृहे रसिकांसाठी पुन्हा सज्ज झाली आहेत. यावर्षी तब्बल 49 चित्रपट प्रदर्शित होत असले तरी त्यातील अनेक चित्रपट गेल्याचवर्षी तयार झाले होते. फक्त करोनामुळे ते प्रदर्शित होऊ शकले नव्हते.

चालू वर्षात एटीथ्री हा कपिलदेवच्या जीवनावरील चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कपिलदेवच्या संघाने भारताला पहिल्यांदा 1983 मध्ये विश्वकरंडक जिंकून दिला. या चित्रपटात कपिलदेवच्या भूमिकेत रणवीरसिंग दिसणार आहे. ताहिर राज भसीन-सुनील गावस्कर, साकिब सलीम- मोहिंदर अमरनाथ, अमी विर्क – बलविंदरसिंग संधू, साहिर खट्टर – सईद किरमाणी, चिराग पाटील- संदीप पाटील अशी अन्य स्टारकास्ट आहे.

अक्षयकुमारच बेलबॉटम 2 एप्रिल 2021 च्या आसपास प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी यांची प्रमुख भूमिका आहे. अमीर खान आणि करिना कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या लालसिंग चढ्ढा चित्रपटांकडे चाहत्याचे लक्ष लागले आहे. 2020 च्या नाताळमध्येच हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. आता तो 2021 मध्ये लवकरच प्रदर्शित होईल.

सलमान खान, दिशा पटनी, रणदीप हुडा अशी स्टारकास्ट असलेला राधे चित्रपट सलमानच्या चाहत्यांसाठी प्रतीक्षा करायला लावणार आहे. दंबग3 नंतर सलमान आणि प्रभुदेवा या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले आहेत. यंदाच्या ईदच्या निमित्ताने हा चित्रपट प्रदर्शित होईल.
करोनामुळे प्रदर्शनापासून अडकून पडलेला पहिला चित्रपट म्हणजे सूर्यवंशी. मार्च 2020 मध्ये तयार असलेल्या या चित्रपटात अक्षयकुमार आणि कॅटरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
मैदान हा अजय देवगण व प्रियाणी यांचा चित्रपट 15 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल. 1950 मधील भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक अब्दुल रहीम यांची भूमिका अजय देवगणने साकारली आहे.

शाहरूख खानचा पठाण हा चित्रपटही याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. तूफान या चित्रपटात फरहान अख्तरने मुष्टीयोद्ध्याची भूमिका केली असून त्याच्याबरोबर मृणाल ठाकूर या चित्रपटात दिसणार आहे. `अतरंगी रे` या चित्रपटात अक्षयकुमार, सारा अली खान आणि धनुष यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाल ए. आर. रहमानने संगीत दिले आहे.

अक्षयकुमारचाच रक्षाबंधन, शाहिद कपूरचा जर्सी, अलिया भटचा गंगूबाई काठियावाडी, मानुषी छिल्लर आणि अक्षयकुमारचा पृथ्वीराज, रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त यांच्या भूमिका असलेला समशेरा हे चित्रपट चालू वर्षातील आकर्षक ठरतील.

त्याखेरीज जयेशभाई जोरदार, ब्रह्मास्त्र, द बिग बुल, भुज- प्राईड ऑफ इंडिया, बच्चन पांडे, धमाका, तेजस, बॉब विश्वास, रश्मी रॉकेट, फोन भूत, अंतिम, अनेक, सर्कस, भूलभुलैय्या-2, बंटी और बबली-2, संदीप और पिंकी फरार, जुग जुग जियो, चेहरे, लुप लपेटा, सत्यमेव जयते-2, सरदार उधमसिंग, हसीना दिलरुबा, धाकड, कभी ईद-कभी दिवाली असे चित्रपट यंदा प्रदर्शित होत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.