नवी दिल्ली – आधुनिक भारतातील प्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांचे पती व्हिक्टर ईगन यांच्या प्रतिमेच्या अतिशय दुर्मिळ चित्राची विक्री तब्बल 10 कोटी 86 लाख रुपयांना झाली. हे चित्र मॉडर्न इंडियन आर्टच्या ऑनलाईन लिलावात विकले गेले.
लिलावाच्यादरम्यान अतिशय चढओढीने बोली लागल्या आणि प्रसिद्ध कलासंग्रहाक मनोज इसरानी यांनी हे चित्र लिलावात विकत घेतले. या चित्रात अमृता शेरगिल यांचे पती आणि हंगेरीच्या लष्करात डॉक्टर म्हणून काम करणारे ईगन हे गणवेशात दिसत आहेत.
डॉक्टर ईगन यांच्या चेहऱ्यावर भावना आणि वैयक्तिक जीवनाचे भाव प्रकट झाले आहेत. मॉडर्न इंडियन आर्टच्या या लिलावात एकूण 59.89 कोटी रुपयांच्या कलाकृतींची विक्री झाली. त्यामध्ये रामकुमार यांच्या चित्राला 4.34 कोटी रुपये मिळाले.
अमृता शेरगिल यांचे पती व्हिक्टर ईगन यांनी 1939 मध्ये भारतामध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आपल्या पतीच्या कुटुंबियांना भेट म्हणून देण्यासाठी अमृता यांनी हे चित्र काढले होते. अमृता शेरगिल यांनी काढलेली चित्रे जितकी सुंदर आहेत तितक्याच त्या सुंदर होत्या. आजही त्यांच्या चित्रांना भारतात आणि भारताबाहेरही मागणी आहे. त्याच्या चित्रांमध्ये भारतीय संस्कृती आणि संस्कृतीचा आत्मा दिसून येतो.