ढाका : कृष्णभक्तांच्या “इस्कॉन’ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या 31 साधकांना बांगलादेशामध्ये करोना विषाणूची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. बांगलादेशातील स्वामीबाग परिसरातील इस्कॉनच्या आश्रमामधील 31 जणांची करोनाची टेस्ट “पॉझिटिव्ह’ आली आहे, असे गेंदारिया पोलीस स्टेशनचे अधिकारी साजू मियाह यांनी स्थानिक वर्तमानपत्राला सांगितले आहे. संसर्ग झालेल्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले अहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. करोनाचा फैलाव अधिक होऊ नये यासाठी या परिसरातील रस्ते पूर्ण बंद केले गेलेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
बांगलादेशात करोनाचा पहिला रुग्ण 8 मार्च रोजी सापडला. त्यानंतर इस्कॉनचे कृष्णमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले. त्यानंतर काल (शनिवारी) हे मंदिरही पूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. या मंदिराच्या आवारात पुजारी, मंदिराचे व्यवस्थापक आणि काही भाविक असे सुमारे 100 जण वास्तव्यास असतात. मंदिर बंद असतानाही मंदिरातील संबंधितांना करोनाची लागण कशी झाली, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
“कोणालाही मंदिरात जाऊ दिले नाही. इतकी काळजी घेतली गेली, तरी इतक्या लोकांना संसर्ग कसा झाला हे मला समजले नाही, असे मियाह यांनी सांगितले. बांगलादेशामध्ये करोनाच्या प्रतिबंधासाठी सध्या पूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. बांगलादेशामध्ये सध्या करोनाचे 5 हजार रुग्ण असून 140 जणांचा मृत्यू झाला आहे.