सातारा – जिल्ह्यातील 13 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना दहा दिवसांनी शुक्रवारी घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. देगाव, ता. सातारा येथील 60 वर्षांचा पुरुष, कुसवडे येथील 58 वर्षांचा पुरुष, कुस बुद्रुक येथील 16 वर्षांचा मुलगा, कुसवडे (आसनगाव) येथील 47 व 19 वर्षे वयाच्या दोन महिला, वाई तालुक्यातील 30 वर्षांची महिला, सोमेश्वरवाडीतील 68 वर्षांची महिला, वेरुळीतील 46 वर्षांचा पुरुष, 11 वर्षांचा मुलगा व 26 वर्षांची महिला, बरड, ता. फलटण येथील 55 वर्षांची महिला, भणंग, ता. जावळी येथील 40 वर्षांची महिला, जावळी तालुक्यातील 55 वर्षांचा महिला यांना घरी सोडण्यात आले.
जिल्हा रुग्णालयातील 30, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 41, उपजिल्हा रुग्णालयातील 18, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 19, वाई ग्रामीण रुग्णालयातील सहा, शिरवळ येथील 19, रायगाव येथील सहा, पानमळेवाडी येथील 14, मायणी येथील 15, महाबळेश्वर येथील तीन, पाटण येथील पाच, दहिवडी येथील 37, अशा एकूण 213 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पुणे येथील एनसीसीएस व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 167 नागरिकांच्या घशातील स्रावांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
आणखी 17 जणांना गुरुवारी बाधा
दरम्यान, आणखी 17 जणांचे रिपोर्ट गुरुवारी (दि. 18) रात्री पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या 791 झाली आहे. त्यापैकी 593 रुग्णांनी करोनावर मात केली असून आतापर्यंत 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज व पुण्याच्या एनसीसीएस येथे तपासणी करण्यात आलेल्या 17 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले.
यामध्ये वाकळवाडी, ता. खटाव येथील 61 वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी गुरुवारी रात्री दिली. कराड तालुक्यातील वडगाव (उंब्रज) येथील 59 वर्षांचा पुरुष, तारुख येथील 22 वर्षांचा युवक, येळगावमधील 65 वर्षांचा पुरुष, गोवारेतील 39 वर्षांचा युवक, सैदापुरातील 29 वर्षांचा युवक व सुपने येथील 37 वर्षांची महिला, पाटण तालुक्यातील कराटे येथील 59 वर्षांचा पुरुष, कोरेगाव येथील 39 वर्षांची महिला, फलटण तालुक्यातील शेऱ्याचीवाडी (हिंगणगाव) येथील दहा वर्षांचा मुलगा, दहिवडी, ता. माण येथील 39 वर्षे, 21 वर्षे व 17 वर्षे वयाचे तरुण, खटाव तालुक्यातील शिरसवडीतील चार वर्षांची बालिका व 32 वर्षांची महिला, सातारा तालुक्यातील आरे तर्फ परळी येथील 55 वर्षांचा पुरुष, वाई तालुक्यातील कडेगाव येथील 74 वर्षांची महिला यांचा बाधितांमध्ये समावेश आहे.
वाकळवाडी, ता. खटाव येथील 61 वर्षांचा पुरुष 14 जूनला मुंबईतून आला. तो घरीच विलगीकरणात होता. ताप व श्वासास त्रास होत असल्याने त्याला निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रातून 17 जूनला कराडच्या कृष्णा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.