कराड – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने गेल्या वर्षी जुलैमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून यामध्ये कराड येथील प्रसाद बसवेश्वर चौगुले याने पहिला क्रमांक पटकावला आहे. मागासवर्गीय प्रवर्गातून रवींद्र शेळके तर महिला प्रवर्गातून पर्वणी पाटील प्रथम आल्या आहेत.
प्रसाद चौगुले याचे मूळ गाव कराड असून त्याने इंजिनिरिंगची पदवी कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून घेतली आहे. प्रसादचे शालेय शिक्षण खावली (सातारा) येथील जवाहर नवोदय विद्यालयातून झाले आहे. त्याचे वडील शहापूर एमआयडीसीतील एका कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करतात तर आई गृहिणी आहे. एमपीएससीच्या निकालानंतर प्रसादचे अभिनंदन करण्यासाठी कोयना वसाहत येथे त्याच्या घरी नागरिकांनी गर्दी केली होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 420 परीक्षार्थींची निवड यादी शुक्रवारी प्रसिद्ध केली. गेल्या वर्षी 13 ते 15 जुलै या कालावधीत मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेला राज्यातून तीन लाख 60 हजार 990 विद्यार्थी बसले होते. त्यातून सहा हजार 825 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ठरले होते. त्यातील 420 यशस्वी विद्यार्थी अंतिम निवड यादीत पात्र ठरले आहेत.