सांगली -सांगली जिल्ह्यात आणखी 11 जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या 178 झाली आहे. त्यापैकी 75 जणांवर मिरज येथे करोना रुग्णालयात उपचार सुरू असून सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
मुंबईतून पलुस तालुक्यात आलेल्या सहा जणांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांच्या स्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला
आहे. बोरिवलीतून पलूस येथे आलेल्या 88 वर्षांच्या महिलेच्या नातवाला करोनाची लागण झाली आहे; परंतु त्या महिलेच्या मुलीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
मुंबईतून 31 मे रोजी येलून, ता. वाळवा येथे आलेल्या 65 वर्षांच्या वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मांगले, ता. शिराळा येथील एका खासगी डॉक्टरला व त्याच्या भावाला करोनाची लागण झाली आहे. मणदूर, ता. शिराळा येथील करोनाबाधित मृताच्या पत्नीचा अहवालदेखील सोमवारी पॉझिटिव्ह आला.
जत येथील करोनाबाधित चालकाच्या आईचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे.