181 जण करोना पॉझिटिव्ह आढळले पुणे – शहरात सोमवारी आणखी 181 करोनाबाधित सापडले आहेत. बाधितांच्या संख्येने आठ हजारांचा टप्पा पार केला आहे. तर, दिवसभरात 166 व्यक्ती ठणठणीत बरे झाले आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासांत 13 जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. शहरात मागील दोन दिवसांपासून नमुने तपासणीची संख्या कमी झाली होती. मात्र, सोमवारी तब्बल 2, 108 जणांचे नमुने तपासणी करण्यात आली आहे. सध्या शहरातील विविध रुग्णालयांत 2,486 बाधितांवर उपचार सुरू आहे. त्यामध्ये नायडू आणि त्याअंतर्गत असलेल्या रुग्णालयात एकूण 1,728, ससून रुग्णालयात 152 तर खासगी रुग्णालयात 606 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 204 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 43 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आला असून, 161 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर 6 हजार 544 जणांना क्वांरंटाइन करण्यात आले आहे. शहरात आणखी तपासण्या करण्याचे काम सुरू असल्याने रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 24 तासांत 13 जणांचा मृत्यू… शहरात गेल्या 24 तासांत आणखी 13 जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये चंदननगर, नानापेठ, मार्केटयार्ड, गोखलेनगर, पर्वती, कोंढवा खुर्द, घोरपडी पेठ, धनकवडी, आंबेडकर वसाहत, खराडी-येरवडा, कॅम्प परिसरातील राहणारे होते. आंबेडकर वसाहतीमधील 35 वर्षीय, तर गोखलेनगर येथील 30 वर्षीय व्यक्ती वगळता तर अन्य सर्व 64 ते 78 वयोगटातील आहे. यातील बहुतांश व्यक्तींना जुने होते.