कराड -उंब्रज परिसरातील अवैध वाळू चोरीची व वाळूमाफियांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी सोमवारी दिले. “महसूल व पोलिसांच्या वरदहस्ताने वाळू उपसा’ या दैनिक “प्रभात’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत प्रांताधिकाऱ्यांनी उंब्रजचे मंडलाधिकारी
व तलाठ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
वरकमाईला सोकावलेल्या महसूल यंत्रणेतील कर्मचाऱ्यांमुळे कराड तालुक्यात तासवडे, वराडे, वहागाव, शिवडे येथे वाळू चोरीला ऊत आला होता. रात्रीच्या अंधारात हजारो ब्रास वाळू उत्खनन सुरू
आहे. महसूल यंत्रणा व पोलिसांबरोबर “मांडवली’ करून शासनाला लाखो रुपयांचा गंडा घातला जात असल्याचे वृत्त दै. “प्रभात’ने प्रसिद्ध केल्यावर महसूल विभागाला खडबडून जाग आली. प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी उंब्रजचे मंडलाधिकरी व तलाठ्यांना सोमवारी दुपारी 4 वाजता तातडीने बोलावून घेत त्यांच्या दालनात बैठक घेतली.
यावेळी निवासी नायब तहसीलदार देवकर उपस्थित होते. या बैठकीत गावानिहाय वाळू उपशाबाबत दिघे यांनी चौकशी केली. उत्तरमांड, तारळी व कृष्णा नदीपात्रात कोठे वाळू उपसा सुरू आहे? वाळूचा साठा कोठे करण्यात आला आहे, यावर चर्चा झाली. संबंधित वाळूमाफियांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिघे यांनी मंडलाधिकारी व तलाठ्यांना दिले.