मुंबई : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी ‘मोदी एक्सप्रेस’ची घोषणा केली. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत रेल्वे सोडण्यात येणार असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं.
“दरवर्षी मी आपल्यासाठी गणेशोत्सवात बसेस सोडतो. पण यावर्षी आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणार आहोत. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देऊन नरेंद्र मोदींनी कोकणाला आशीर्वाद दिला. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी मोदी एक्स्प्रेस सोडत आहोत,” अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.
१८०० नागरिकांसाठी ही ट्रेन सोडण्यात येणार असून दादरहून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन ही ट्रेन सुटणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली. प्रवासात एक वेळचं जेवणदेखील दिलं जाणार आहे.
या रेल्वेच्या बुकींगसाठी नितेश राणे यांच्या मतदार संघातील गणेश मंडळाच्या अध्यक्षांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबदरम्यान या ट्रेनसाठी फोन करून बुकींग करता येणार आहे.