जम्मू काश्मीरसाठी स्वतंत्र विभाग
द्विपकल्प, हवाई, तसेच नाविक विभागही अस्तित्वात येणार
प्रशिक्षण आणि व्युहरचनेसाठीही विभाग असणार
नवी दिल्ली : देशाच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवरील भविष्यातील सुरक्षाविषयक आव्हानांचा विचार करता देशात आगामीकळत् दोन ते पाच “थिएटर कमांड’ असतील. या पैकी पहिला विभाग 2022 मध्ये सक्रिय केला जाईल, असे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज सांगितले. जन. रावत यांनी आज संरक्षण दलांमधील पहिल्या सुधारणांची माहिती दिली.
जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा आव्हाने नवीन थिएटर कमांडद्वारे हाताळल्या जातील. तसेच असे संरक्षण दल प्रमुखांनी काही पत्रकारांशी बोलताना सांगितले. पाकिस्तानातून होणाऱ्या कारवाया लक्षात घेऊन काश्मीरसाठी स्वतंत्र कमांड बनवण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत जम्मू काश्मीरमध्ये अस्तित्वात असलेल्या संरचनांची सुधारणा करूनच नवीन विभागाची निर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अप्रचलित गोष्टींबाबत येणाऱ्या समस्या 114 लढाऊ विमानांसारख्या प्रमुख लष्करी प्लॅटफॉर्मच्या खरेदी-विक्रीसाठी नवीन दृष्टिकोन तयार केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
जनरल बिपीन रावत यांना 31 डिसेंबर रोजी देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात् आले. भविष्यातील सुरक्षाविषयक आव्हानांचा विचार करता संरक्षण दलांच्या रचनेमध्ये सुधारणा करणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे.
प्रस्तावित द्वीपकल्प कमांड भारतीय नौदलाच्या पूर्व आणि पश्चिम विभागांच्या विलीनीकरणाद्वारे 2021 च्या अखेरीस आकार घेण्याची शक्यता आहे. नौदलाच्या अख्त्यारितील या कमांडला हवाई दल आणि लष्कराचे सहाय्य असेल.
या विभागाद्वारे संपूर्ण भारतीय सागरी भागातील सागरी सुरक्षेची जबाबदारी घेतली जाईल, असेही जन. रावत यांनी सांगितले. तसेच हवाई संरक्षण विभागाचीही उभारणी पुढच्या वर्षाच्या मध्यादरम्यान केली जाईल. यामध्ये लष्कराची क्षेपणास्त्रे आणि नौदलाच्या क्षेपणास्त्रांचा समावेश असेल.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या धर्तीवर प्रशिक्षण आणि दस्ताऐवजांसाठीचा स्वतंत्र विभाग सुरू करण्याचीही सरकारची योजना आहे. तर तिन्ही सैन्य दलांच्या व्युहशास्त्राच्या गरजांवर लक्ष देण्यासाठी एक स्वतंत्र विभाग असेल. हवाई दलाचे उपप्रमुखांच्या नेतृत्वाखाली हवाई संरक्षण विभागासाठीचे अभ्यास केला जात आहे. 31 मार्चपर्यंत हे काम पूर्ण करण्यास त्यांना सांगण्यात आले आहे.
द्विपकल्पासाठीच्या विभागाचे कामही पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत सुरू होईल.
निश्चित भूभागातील कारवाईसाठीचा देशातील पहिले “थिएटर कमांड’ 2022 पर्यंत करण्याचे उद्दिष्ट आहे. हा विभाग जम्मू काश्मीरसाठी असेल. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेचाही समावेश असल्याचेही जन. रावत यांनी सांगितले.
प्रत्येक थिएटर कमांडमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या तुकड्या असतील. हे सर्व मिळून ठराविक भूभागातील सुरक्षा विषयक आव्हानांबाबत एकत्र कारवाई केली जाईल. सद्यस्थितीत लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे स्वतंत्र विभाग कार्यरत आहेत. भारतीय बनावटीची शस्त्रे आणि साधनांचा जास्तीत जास्त वापर, तिन्ही दलांसाठी संरक्षण सामुग्री खरेदीसाठीच्या योजनांचा आराखडा, उपलब्ध निधीचा सुयोग्य पद्धतीने विनियोग, प्रशिक्षण, खरेदी आणि कारवाईसाठीच्या खर्चात ताळमेळ साधण्याच्या संदर्भानेही मोठ्या बदलांचे सूतोवाच संरक्षण दल प्रमुखांनी केले.