दीड लाख जाहीर करून 20 हजारांवर बोळवण

कुस्तीपटूंच्या पुरस्कार रकमेबाबत संभ्रम

पुणे : प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर पुरस्कार रकमेबाबत कडाडून टीका केली आहे. अर्थात परिषदेने यावर कानावर हात ठेवले आहेत. नाशिकचा मल्ल हर्षवर्धन सदगीरने किताबी लढत जिंकली मात्र परिषदेने विजेत्याला दीड लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करून केवळ 20 हजार रुपये देऊन बोळवण केल्याचे काका पवार यांनी सांगितले.

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली. अंतिम फेरीत हर्षवर्धनने आपल्याच तालमीतल्या शैलेश शेळकेवर 3-2 ने मात करत मानाची गदा पटकावली. हे दोन्ही मल्ल काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा यांच्यातर्फे या
स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अमनोरातर्फे सुवर्णपदक विजेत्याला 20 हजार, रजतपदक विजेत्याला 10 हजार आणि ब्रॉंझपदक विजेत्याला 5 हजार अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. मात्र किताब विजेत्याला दीड लाख तर उप-विजेत्याला 75 हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात आमचा भ्रमनिरास झाला, असे काका पवार यांनी सांगितले.

परिषदेकडून स्पष्टीकरण
प्रत्येक वजनी गटातील सुवर्णपदक विजेत्याला 20, रजतपदक विजेत्याला 10 तर, ब्रॉंझपदक विजेत्याला 5 हजारांचे रोख बक्षीस देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे बक्षिसे देण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त काहीही जाहीर करण्यात आले नव्हते, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.