सोनई – गोवंशी जनावरांना लम्पी आजारांने पुन्हा ग्रासले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने जनावरांचा आठवडे बाजार गेल्या दहा दिवसापासून बंद आहे. राज्यात प्रसिद्ध असलेल्या घोडेगावच्या जनावरांच्या बाजारात बंद मुळे शुकशुकाट पसरला आहे. त्यामुळे येथे होणारे लाखोचे व्यवहार थांबले आहेत. याचा मोठा फटका पशुपालक शेतकऱ्यासह जनावरांचे व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांना बसला आहे.
या बाजारामध्ये राज्यासह इतर राज्यातूनही गाई,म्हशी विक्रीसाठी गुजरात, सुरत, ठाणे, कल्याण, नगर ,नाशिक, धुळे, मालेगाव आदी ठिकाणाहून आणल्या जातात. येथील बाजारात दोन ते अडीच हजार जनावरांची खरेदी ,विक्री होते. यासोबतच शेळ्या, मेंढ्याचीही व्यवहार होतो.
येथील बाजारात मोठे दुकानदार, व्यवसायिकाची आठवड्याला तीन ते चार कोटीची उलाढाल होते. परिणामी तालुक्यासह जिल्ह्यातील अर्थकारणाला चालना मिळत. मात्र गेल्या दहा दिवसापासून जनावरांना लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने शेकडो जनावरे मृत्यू पावत आहेत. आजाराचा वाढता धोका लक्षात घेता नगर जिल्हा प्रशासनाने जनावरांचा बाजार बंद करण्याचा आदेश दिल्याने जिल्ह्यातील सर्व जनावरांचे आठवडे बाजार बंद आहेत. पशुवैद्यकीय विभागाकडून जनावरांचे लसीकरण व औषधोपचार सुरू आहेत.या आजाराने पुन्हा डोके वर काढल्याने पशुधन धोक्यात आले आहे. एकूणच आजाराचा विळखा दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
त्यातच पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा संकटात असताना आता लंपी आजाराने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण ढासळले आहे. दूध धंदाही धोक्यात आला आहे
नेवासा तालुक्यातील लम्पी गस्त जनावरांची संख्या
बेलेकर वाडी—७,
लेकुरवा आखाडा-१०, वडाळा _ ६२ जैनपुर- २८, बाबुळवेढा _१०, लोहगाव- ३, वाकडी १, भानसहिवरा -४२, देडगाव _ १९, नेवासा बुद्रुक- ७१, गळलिब _ २०, देवसडे _५, मृत जनावरांची संख्या २०
पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा
मागील वर्षी पेक्षा यंदा आजाराचे प्रमाण तालुक्यात कमी आहे लसीकरण पूर्ण झाले असून जनावरांना लंपी रोगाचे लक्षण असल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची तात्काळ संपर्क करावा.
_ डाॅ. टी.डी. घुले पशुवैद्यकीय विकास अधिकारी, नेवासा