तळेगाव दाभाडे – पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने वाढलेला मशागतीचा खर्च, दुधाचा कमी खरेदी दर, पशुखाद्याचे वाढते दर व खताच्या किमतीतही वाढ झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला असतानाच पावसानेदेखील ओढ दिली आहे. हे कमी की काय म्हणून पशुसंवर्धन विभागाने पशुवैद्यकीय सेवा शुल्कातही मोठी वाढ केल्याने पशुपालकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. यंदाचा खरीप हंगाम पशुपालकांसाठी मोठा अडचणीचा ठरत आहे.
उत्पादनवाढीकरिता शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्याचे केंद्र व राज्य सरकारचे धोरण आहे. त्याकरिता विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याअंतर्गत राज्यातील पशूसंवर्धन विभाग हा एप्रिल 2000 पर्यंत सर्व पशुपालकांना काही सेवा वगळता निःशुल्क सेवा देत होता. याचा पशूपालकांना मोठा आधार होता. त्यानंतर वेळोवेळी या सेवाशुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर अत्याधुनिक सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात साधनसामग्री खरेदी करण्यात आल्या.
या साधनसामग्रीचे वाढलेले दर, त्यासाठी लागणारी रसायने, औषधे, शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे यांच्या किमतीत वारंवार वाढ झाल्याचे कारण देत वेगवेगळ्या सेवा सुविधा पुरवण्यासाठी नव्याने केलेली दरवाढ राज्यात 21 जून 2022 पासून लागू करण्यात आली आहे. 23 मे 2022 रोजी च्या शासन निर्णयानुसार ही दरवाढ जवळजवळ दुप्पट ते काही बाबतीत दहा पट करण्यात आली आहे.
मागील काही वर्षांत कृत्रिम रेतनासाठी सेवाशुल्क हे रुपये वीस रूपयांवरून आता नवीन निर्णयानुसार पन्नास रूपये करण्यात आले आहे. त्याचबरोबर कुक्कुट पक्षी लसीकरणाचे सेवाशुल्क दहा पैशांवरून एक रुपया करण्यात आले आहे. सोनोग्राफी, एक्स-रे यामध्ये देखील दुप्पट वाढ झाली आहे. दैनंदिन उपचार शुल्क हे पूर्वी फक्त केसपेपरसाठी एक रुपया आकारण्यात येत होते. आता त्या ऐवजी दहा रुपये करण्यात आले आहे.
पशूसंवर्धन विभागामार्फत परिसरातील कुक्कुटपालन, कृत्रिम रेतन, दैनंदिन उपचार या बाबींच्या नियमितपणे पशूपालकांना सेवा घ्याव्या लागतात. त्याचे उद्दीष्टदेखील संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यांना देण्यात आलेले असते. त्यामुळे या बाबींना विभागामार्फत चालना दिली जात असताना त्यामध्ये झालेली वाढ हा विरोधाभास दिसत आहे.
वाढलेली महागाई, दुधाचे दर, पशुखाद्याचे वाढलेले दर, या पार्श्वभूमीवर कमीत कमी पशुवैद्यकीय दवाखान्यात प्रत्यक्ष येऊन जे पशुपालक सेवा घेतात, घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी तरी कमीत कमी सेवाशुल्क असावे. ज्या सेवा नियमित घेतल्या जातात त्यासाठीच्या सेवा शुल्काबाबत निश्चितच विचार होणे आवश्यक आहे.
– अशोक गायकवाड, पशुपालक