माजी नगरसेवक नाना भानगिरे यांच्या मागणीला यश
पुणे -शहरी गरीब योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा आणि हे कार्ड मिळवण्यासाठी लागणारा वेळ वाचावा, यासाठी हे कार्ड आता क्षेत्रीय कार्यालयस्तरावर मिळणार आहे. त्यामुळे, हे कार्ड काढण्यासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना महापालिकेच्या मुख्य इमारतीत येण्याची आवश्यकता राहणार नाही.
शहरी गरीब योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील नागरिकांना महापालिका भवनात येऊन कागदपत्रे जमा करून कार्ड घ्यावे लागते. नागरिकांचा वेळ वाचावा तसेच एकाच ठिकाणी कर्मचाऱ्यांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी योजनेचे कार्ड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये देण्याची व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे. मात्र, योजनेचा लाभ घेण्यासंदर्भात प्रस्ताव महापालिका भवनातच स्वीकारले जातील, असे महापालिकेतील संबंधित खात्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. त्यामध्ये हे कार्ड देण्याची व्यवस्था क्षेत्रीय कार्यालयांमध्ये करावी. म्हणजेच या व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करावे, अशी मागणी केली होती. एका महिन्याच्या आत ते न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर, या मागणीसाठी भानगिरे यांनी सातत्याने पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्याकडे पाठपुरावा करत, त्यासाठी ॲप विकसित करण्याची मागणीही केली होती.
महापालिकेतच हे कार्ड पूर्वीपासून दिले जाते. मात्र या योजनेचा दुरूपयोग अनेकजण करत होते. एकाच कुटुंबातील अनेकजणांकडे स्वतंत्र कार्ड होते. याशिवाय, दिली जाणारी बिले आणि खर्चाचा काहीच ताळमेळही नव्हता. ही प्रक्रिया “मॅन्युअल’ होती. उपरोक्त प्रकार होऊ नयेत यासाठी आता ही प्रक्रिया संगणकीकृत करण्यात येणार आहे. याशिवाय एकाच कुटुंबात एकपेक्षा अधिक कार्ड आहेत का, याची तपासणीही करण्यात येणार आहे.
मर्यादेपेक्षा अधिक लाभ घेण्याचे काही प्रकार नागरिकांकडून होत आहे का, याची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच एका कुटुंबाला एकच कार्ड मिळत असताना कोणी एकापेक्षा अधिक कार्ड काढले आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे. तसेच योजनेची सर्व प्रक्रिया संगणकीकृत करण्याचे काम सुरू आहे. ते लवकरच पूर्ण होईल. याशिवाय यासंदर्भात ऍपही विकसित करण्यात येणार आहे.
– डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख, महापालिका