मुंबई – आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख यांच्या न्यायलयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे अनिल देशमुख यांना आणखी 14 दिवस ऑर्थर रोड जेलमध्ये मुक्काम करावा लागणार आहे.
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर तीन महिन्यांपासून ते कारागृहात आहेत. मुंबई माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या घरावर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाने छापेमारी केली.
मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने पाच वेळा समन्स बजावले होते. मात्र, त्यानंतर अनिल देशमुख ईडीसमोर हजर राहिले नव्हते. यानंतर त्यांच्या नावाने लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले. तसेच त्यांना शोधण्यासाठी सीबीआयची मदत मागण्यात आली. याचदरम्यान, 1 नोव्हेंबर रोजी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यावेळी त्यांची तब्बल 12 तास चौकशी करण्यात आलीे. त्यानंतर ईडीने त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई केली होती.