मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईतील परळच्या केईएम रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये शुक्रवारी अनिल देशमुखांना दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, त्याच्या औषधोपचार आणि प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यांची स्ट्रेस थिलियम हार्ट टेस्ट करायची असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची लवकरच वैद्यकीय चाचणी केली जाणार असल्याचे समजते.
दरम्यान, अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचार प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार आहे. सचिन वाझेच्या अर्जावर 30 मो रोजी सीबीआय कोर्टात सुनावणी होणार आहे. मनसुख हिरेन आणि वसुलीच्या आरोपांखाली अटकेत असलेल्या सचिन वाझेंनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांचे वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या ते सीबीआय कोठडीत आहेत.