मनशा सोसायटीसमोर कचरा टाकण्यास विरोध
वाघोली- पुणे- नगर महामार्गालगत मनशा सोसायटीसमोरील मोकळ्या शासकीय जागेत सध्या ग्रामपंचायतीच्या कचरा गाड्या कचरा टाकत आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीने त्रस्त मनशा सोसायटीधारकांनी शनिवारी (दि.19) ठिय्या आंदोलन करून कचरा टाकणाऱ्या घंटागाड्या रोखल्या. कचरा टाकू नये, अशी मागणी सोसायटीधारकांनी केली आहे. तोंडाला रुमाल लाऊन कचरा टाकण्यास नागरिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. त्यामुळे हे आंदोलन लक्षवेधी ठरले.
मनशा सोसायटीसमोर कचरा टाकू नये, असे अशी तोंडी व लेखी मागणी सोसायटीतील नागरिकांनी करूनही कचरा टाकला जात होता. संतप्त नागरिकांनी शनिवारी तीव्र निषेध व्यक्त केला. ग्रामपंचायतीने कचरा टाकला तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला. नवीन कचरा प्रकल्पाबाबत प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीनंतर त्याला गती येईल. तोपर्यंत दोन ते तीन ठिकाणी कचरा टाकावा लागणार आहे. ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येईल, असे ग्रामविकास अधिकारी मधुकर दाते यांनी सांगितले.