कर्जत (विजय डेरवणकर) -शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक प्रयत्न होताना दिसत आहेत; मात्र काही निराशावादी घटकांमुळे सर्व उपक्रम यशस्वीपणे न राबवता त्याला बगल दिली जाते. कर्जतमधील गट शिक्षणाधिकारी संतोष दौंड यांच्या नवीन उपक्रमाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सर्व अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षित करण्यासाठी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना घेऊन त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक शासकीय कार्यक्रम हाती घेतले जात आहेत . विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या आणि इंग्रजी माध्यमकडे वाढलेला ओढा हा सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी काहीसा चिंताजनक विषय बनलेला आहे. त्यात प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याला पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचा असलेला ओढा त्यामुळे बरेच पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये भरती करतात.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 नुसार प्रत्येक शाळांमध्ये प्रादेशिक भाषेत शिक्षण देणे तसेच सर्व शिक्षकांना प्राधान्याने प्रशिक्षित करणे असे अनेक उपक्रम आहेत. त्याचाच फायदा घेत कर्जतमधील गट शिक्षणाधिकारी संतोष दौंड यांनी सर्व प्राथमिक शिक्षकांच्या अनुभवाचा फायदा घेत सर्व अंगणवाड्या ह्या प्रशिक्षित व्हाव्यात, यासाठी प्राथमिक शिक्षकांना शनिवारी अंगणवाडीमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना तीस मिनिटे पायाभूत शिक्षण देण्यास सांगितले आहे. शिकविण्याच्या या पद्धतीचा निरीक्षण करून अंगणवाडी सेविकांना विद्यार्थ्यांना अध्यापन कसे करावे याविषयी माहिती मिळते व अध्यापनामध्ये फायदा होतो. विद्यार्थ्यांना तसेच अंगणवाडी सेविकांना या वैविध्यपूर्ण शिक्षणाचा मोठा फायदा होताना दिसून येत आहे.
हा उपक्रम आम्ही सर्व शिक्षकांना सोबत घेऊन प्रत्येक शनिवारी अंगणवाड्या आणि बालवाड्यांमध्ये राबविला. प्रशिक्षण शिबिर आणि शिक्षणामुळे अनेक अंगणवाड्या शंभर टक्के विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान निकषानुसार क्षमता विकसित करू शकले आहेत. तसेच त्याचा फायदा सर्व अंगणवाडी सेविकांना सुध्दा होत आहे.
-संतोष दौंड, गटशिक्षणाधिकारी कर्जत