…आणि आर्त किंकाळ्या

ऍल्कॉन स्टायलस सोसायटीतील रहिवाशांनी सांगितली आपबिती

पुणे – “शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अचानक मोठा आवाज झालेला ऐकला. बाहेर डोकावून पाहिले तर सोसायटीच्या पार्किंगची भिंत कोसळलेली दिसली. तेथून लोकांच्या किंचाळण्याचा आवाज येत होता. ताबडतोब घराबाहेर पडून इतर शेजारच्यांना उठवून घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, काहींनी अग्निशमन दल आणि पोलिसांना फोन केला.

तोवर नागरिकांनी तातडीने हालचाली करत ढिगाऱ्याखाली सापडलेल्यांना बाहेर काढण्यास सुरूवात केली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहचताच त्यांच्या मदतीने पहाटे चार वाजेपर्यंत 10 ते 11 मृतदेह बाहेर काढले,’ अशी थरारक आपबिती ऍल्कॉन स्टायलस सोसायटीतील रहिवाशांनी सांगितली. “शेजारी काम सुरू असलेल्या बांधकाम व्यावसायिकाने मजुरांना राहण्यासाठी सोसायटीच्या संरक्षक भिंतीजवळ ट्रान्झिस्ट कॅम्प उभारला होता. मागील काही दिवसांपासून हे कामगार तेथे काम करत होते.

शुक्रवारीही दिवसभर काम केल्यानंतर ते रात्री झोपड्यांमध्ये विसावले होते. मात्र, पहाटे साखर झोपेत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. यामध्ये कामगार, त्यांच्या पत्नी आणि मुलांचाही मृत्यू झाला. त्यांच्या मदतीसाठी केलेल्या आर्त किंकाळ्या अद्यापही आमच्या कानात घुमत आहेत. अग्निशमन दल, एनडीआरएफ आणी पोलिसांच्या मदतीला आम्हीही पहाटेपर्यत होतो. एकाच वेळी इतक्‍या जणांचा डोळ्यादेखल झालेला मृत्यू पाहून धक्का बसला,’ अशी प्रतिक्रिया येथील रहिवासी देत होते.

मी इमारतीच्या नवव्या मजल्यावर रहात आहे. मोठा आवाज आणि किंकाळ्या ऐकून मीदेखील धावत आलो. मातीत अर्ध्या दबलेल्या एका महिलेला आम्ही बाहेर काढले. तोवर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली होती. त्यांच्या मदतीने इतर चार मृतदेह काढले. दबलेल्यांच्या आर्त किंकाळ्या अद्यापही माझ्या कानात घुमत आहेत. ढिगाऱ्याखालून काढलेले मृतदेह बघून मी अद्यापही त्या धक्‍क्‍यातून सावरलो नाही.

– बुऱ्हाण वाकसेपूरवाले, रहिवासी, अल्कॉन स्टायलस

बांधकाम मजुरांच्या नोंदणीसंदर्भात चौकशी केली जाणार आहे. या घटनेत विशेष आर्थिक बाब म्हणून मदत केली जाईल. तसेच बांधकाम व्यावसायिकांना नोंदणीसंदर्भात सक्‍त सूचना देण्यात येतील.

– राजीव जाधव, कामगार आयुक्‍त.

मी मागील वर्षभरापासून सोसायटीमध्ये राहतो. रात्री एकच्या सुमारास कामावरून घरी आलो होते. झोपण्याची तयारी सुरू असतानाच मोठा आवाज झाला. यामुळे खिडकीतून पाहिले असता, लोकांच्या किंकाळ्यांचा आवाज येत होता. यामुळे धावतच सोसायटीतील इतर नागरिकांबरोबर खाली आलो. पार्किंगच्या जागेकडून आवाज येत असल्याने तिकडे धावत गेलो. तेथील भिंत कोसळून त्याखाली झोपड्या दबल्याचे चित्र दिसले. यामुळे इतर रहिवाशांच्या मदतीने तातडीने मदतकार्य सुरू केले. मात्र, पुरेसा उजेड नसल्याने फार काही करता आले नाही. दरम्यान, इतर यंत्रणा आल्यावर त्याच्या मदतीने चार ते पाच मृतदेह बाहेर काढले. पार्किंगची भिंत खचत असल्याचे सोसायटीतील रहिवाशांनी बिल्डरला सांगितले होते.

– यासिर अहमद, रहिवासी, अल्कॉन स्टायलस.

कोंढव्यातील घटना अतिशय दुर्दैवी आहे. याला जबाबदार प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने मदतकार्य सुरू केले. प्रत्यक्ष पाहणी केली असता, या घटनेला दोन्ही बांधकाम व्यावसायिक जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच जी भिंत पडली, त्याला काम पूर्ण झाल्याचा दाखला महापालिकेकडून देण्यात आला असून याप्रकरणी पालिकेचे स्ट्रक्‍चरल इंजिनिअर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला असल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येईल.

– मुक्‍ता टिळक, महापौर, पुणे

पुणे शहरात आजवर 50 बांधकाम साईटवर काम केले आहे. येथे कामावर येण्याअगोदर आम्ही बिहारला गेलो होतो. तेथे मक्‍याची शेती कापून झाल्यावर दोन दिवसांपूर्वीच येथे 20-22 लोक कामाला आलो. रात्री दीडच्या सुमारास भिंत कोसळून आठ झोपड्या दबल्या गेल्या. त्यामध्ये 18 व्यक्ती होत्या. मी रात्री 1. 20 वाजता जाग आल्याने उठलो होतो. थोडा बाहेर जाऊन पुन्हा झोपायला आल्यावर भिंत कोसळली. मी जीव वाचवण्यासाठी मोठमोठ्याने आवाज दिला. तेव्हा शेजारच्या झोपडीतील रहिवाशांनी “हा जिवंत आहे, याला पहिले काढू’ म्हणत मला ढिगाऱ्याखालून काढले. या घटनेत माझा भाऊ अलोक शर्मा याचा मृत्यू झाला. तसेच एका नातेवाईकाचाही मुलगा मृत झाला आहे.

– विमल शर्मा, दुर्घटनेत वाचलेला कामगार

Leave A Reply

Your email address will not be published.