काळरात्र !

मजुरांच्या झोपड्यांवर  भिंत कोसळली
15 जण ठार
-मृतांमध्ये महिला, चिमुकल्यांसह दोन कुटुंबांचा समावेश
-तिघांचा जीव वाचविण्यात बचाव पथकांना यश
-कोंढवा परिसरात शनिवारी मध्यरात्रीची घटना
-मृतांमधील सर्व मजूर बिहारमधील रहिवासी
-बांधकाम व्यावसायिकांसह 8 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
-स्कूल व्हॅनसह तीन कार आणि काही दुचाकीही ढिगाऱ्याखाली

पुणे – सोसायटीची सीमाभिंत कोसळून 15 बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास कोढव्यात घडली. मृतांमध्ये महिला व बालकांचाही समावेश असून दोन कुटुंबांतील सर्वच सदस्यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. दरम्यान, ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आले आहे. अग्निशमन आणि एनडीआरएफ दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केले. घटनेत जखमी झालेल्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत झालेले सर्व मजूर हे बिहारचे असल्याचे सांगण्यात आले.

रहिवाशांच्या मागणीकडे कानाडोळा
या सोसायटीतील पार्किंगच्या जागेची बाजू खचली होती. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांनी यासंदर्भात मजबूत भिंत नव्याने बांधून द्यावी, यासाठी चार महिन्यांपूर्वी विकसकाकडे मागणी केली होती. मात्र, त्याची दखल विकसकाने घेतली नसल्याची माहिती सोसायटीतील सदस्यांनी दिली. सोसायटीतील सदस्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
कोंढवा दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख, तर जखमींना प्रत्येकी 25 हजारांच्या मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दुर्घटनेप्रती शोक व्यक्‍त करताना मृतांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदनाही व्यक्‍त केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, बांधकाम मजूर राहात असलेल्या कच्च्या झोपडीवर रात्री दीडच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि जखमी व्यक्‍ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी ईश्‍वराकडे प्रार्थना करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)