…आणि रेल्वे इंजिन उतरले रस्त्यावर

पुणे – खडकी स्टेशन परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे रूळ मुख्य रस्त्यावर आहे. यावरून आता रेल्वे वाहतूक बंद आहे. पण, याच बंद मार्गावर बुधवारी रेल्वे इंजिन आल्याने गोंधळ उडाला. एकाच वेळी पीएमपी आणि रेल्वे इंजिन आल्याने इतर वाहनचालकांची धांदल उडाली. मात्र, यावेळी अनेकांच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली. दरम्यान, या रेल्वे रूळाचा उपयोग काय, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

पुणे-मुंबई जुन्या हाय-वेलगतच्या रूळांवरून खडकी येथील दारूगोळा कारखान्यातून साहित्यांची ने-आण केली जात होती. दरवेळी अशी दारूगोळा भरलेली रेल्वे मालगाडी संबंधित परिसरातून जात असताना संरक्षण विभागाचे कर्मचारी तेथे थांबून इतर वाहतूक थांबवित आणि रेल्वे पुढे जात असे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा रेल्वेमार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथून नियमित वाहतूक सुरू असते. पण, बुधवारी बंद असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेचे इंजिन आले. त्यामुळे वाहनचालाकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर इंजिन पाहून वाहनचालक गोंधळले व जिथे रस्ता मिळेल तेथून आपली वाहने काढू लागले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, “खडकी रेल्वे स्टेशन येथे दुसऱ्या गाडीला मार्ग देण्याकरिता अचानक इंजिनला बोपोडी येथील महामार्गावर आणले होते. रेल्वे इंजिनभोवती एकही कर्मचारी रस्ता बंद करण्यासाठी नसल्यामुळे हा प्रकार घडला.’ या साऱ्या प्रकारात कोणतीही दुर्घटना घडली नसली, तरी प्रशासनाचा निष्काळजीपणा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)