एका अपघाताने त्यांचा “श्रावण बाळ’ हरपला

निगडी – अंध माता-पित्याचा “श्रावण बाळ’ अन्‌ पत्नी आणि अवघ्या अडीच वर्षांची चिमुकलीचा आधार एका अपघाताने गमावला. निगडीतील अपघातात 25 वर्षीय सचिन बापू कडाळे या युवकाच्या अपघाती मृत्यूने त्याचे कुटुंब उघड्‌यावर आले आहे. या घटनेने शहर हळहळले आहे.

निगडीतील पवळे उड्डाणपुलावर काल (मंगळवारी) रात्री अकराच्या सुमारास अज्ञात वाहनाची सचिनच्या दुचाकीला धडक बसली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, आज (बुधवारी) पहाटेच्या दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. परंतु, सचिनचा मृत्यू शहरवासियांना चटका लावून गेला.

निगडीतील ओटास्किम येथे सचिन राहत होता. त्याचे आई-वडील दोघेही अंध आहेत. या दोघांनी भिक्षा मागून सचिनला वाढविले. स्वतः मिळेल ते काम करुन सचिनने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. डोळस आणि रुबाबदार असलेल्या सचिनकडे पाहून कोणालाही त्याच्या माता-पित्याबद्दल विश्‍वास बसत नव्हता. सचिनने कुटुंबाची जबाबदारी लवकरच खांद्यावर घेतली.

क्रीडापटू असलेला सचिन आकुर्डीतील एका जीममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करीत होता. लग्न करुन त्याने स्वकष्टाने संसारही थाटला. अंध दाम्पत्याचे घर त्यांच्या मुलाने आनंदाने उजळवले होते. मात्र, त्यांचा आनंद नियतीला पाहवला नाही. काल सचिन जीमवरुन काम संपवून घरी निघाला होता. घरातील सगळे त्याची वाट पाहत होते. परंतु, त्याच्या अपघाताचे वृत्त कानावर धडकले. अपघातातून सचिन बरा होईल, अशी भाबडी आशा त्याच्या घरच्यांना होती. परंतु, एका अपघाताने होत्याचे नव्हते झाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)