दोन्ही डॉक्टरांना पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी करावे लागणार काम
पिंपरी – दोन दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख व वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव यांची बदली करून अनुक्रमे जिजामाता व भोसरी रुग्णालयाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, बुधवार (दि.17) दुपारी महापालिकेच्या प्रशासन विभागाने दोघांच्याही बदल्या रद्द करून पूर्वीच्या ठिकाणी नियुक्ती करण्यासंबंधी परिपत्रक काढले आहे; परंतु डॉ. देशमुख व डॉ. जाधव यांच्याकडे जिजामाता व भोसरी रुग्णालय सक्षमीकरणाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भोसरी व जिजामाता रुग्णालय अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. या दोन्ही रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी डॉ. देशमुख व डॉ. जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामधील, वायसीएम रुग्णालयातील कुटुंब कल्याण विषयक कामकाज, जन्म-मृत्यू नोंदणी, प्रमाणपत्रावर उपनिबंधक स्वाक्षरीचे अधिकार आदींची जबाबदारी डॉ. देशमुख तर “क’ क्षेत्रीय कार्यालयाचे विवाह नोंदणी कामकाजासाठी निबंधक म्हणून डॉ. जाधव यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. याबाबत, बुधवारी दुपारी दोन्ही डॉक्टरांच्या आस्थापना पूर्वीप्रमाणे वायसीएम रुग्णालयात कायम ठेवण्यात आल्याचे परिपत्रक प्रशासन अधिकाऱ्यांनी काढले. तसेच, जिजामाता व भोसरी रुग्णालय लवकरात-लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने नियोजन व सक्षमीकरणाचे कामकाज वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय उपअधीक्षक यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.