लंडन : ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून त्यांच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे, जाहीर भूमिकांमुळे किंवा भारतासंदर्भात केलेल्या सकारात्मक वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत राहिले आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा ऋषी सुनक हे प्रकाशझोतात झाले आहेत. यावेळी त्यांचा चक्क एक बुलेटप्रूफ जॅकेट घातलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो स्वत: ऋषी सुनक यांनीच ट्वीट केला असून त्यांनी नेमकं असं काय केलं याविषयीची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे.
ऋषी सुनक यांचा बुलेटप्रूफ जॅकेट घातलेला आणि स्थानिक सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा करतानाचा एक फोटो मागील आठवड्यापासून सोशल मीडियावर व्हायरल होत होता. या दरम्यान ब्रिटिश सुरक्षा अधिकाऱ्यांच्या कोणत्या ऑपरेशनमध्ये थेट ब्रिटनचे पंतप्रधान सहभागी झाले होते? अशाही चर्चा सुरू झाल्या. यावर ऋषी सुनक यांनी केलेल्या ट्वीटनंतर खुलासा झाला.
ब्रिटनमध्ये बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या स्थलांतरितांना बाहेर काढण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून गेल्या आठवड्यात बुधवारी ‘डे ऑफ अॅक्शन’ मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत नॉर्थ लंडनमधील कारवाईत स्वत: ऋषी सुनक सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी बुलेटप्रूफ जॅकेटही परिधान केले होते.
On Thursday I joined Immigration Enforcement officers clamping down on illegal working, sending a clear message that it's this country who should decide who comes here, not criminal gangs.
This work is key to delivering on my promise to tackle illegal migration & stop the boats. pic.twitter.com/Rj4rXSKH2s
— Rishi Sunak (@RishiSunak) June 16, 2023
ऋषी सुनक यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी, “मी ब्रिटनमधील अवैध कामगारांना बाहेर काढण्याच्या ब्रिटिश प्रशासनाच्या मोहिमेत सहभागी झालो. यातून आम्हाला हा संदेश द्यायचा होता की इथे कोण येईल हे कुठल्या गुन्हेगारांच्या टोळ्या ठरवणार नाहीत, तर आम्ही ठरवू. मी बेकायदा स्थलांतरितांच्या अडचणीवर मात करण्याच्या दिलेल्या आश्वासनाचाच हा भाग आहे”, असे म्हटले आहे. या कारवाईत ब्रिटिश प्रशासनाने आत्तापर्यंत १५९ ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत एकूण १०५ बेकायदा विदेशी स्थलांतरितांना अटक करण्यात आली आहे. हे स्थलांतरित जवळपास २० वेगवेगळ्या देशांमधून ब्रिटनमध्ये आले होते.