मुंबई – बॉलीवूड अभिनेता चंकी पांडे यांची लेक अनन्या सध्या प्रसिध्दीच्या झोतात आहे. लवकरच तिचा ‘ड्रीम गर्ल 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती आयुष्यमान खुरानासोबत झळकणार आहे. सध्या हे दोघेही कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. मात्र नुकतेच अनन्याने एका मुलाखतीदरम्यान ट्रोलिंगबद्दल भाष्य केले आहे. हल्ली बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अनेक कलाकार ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देतात. तर काही जण ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतात.
एका मुलाखतीदरम्यान अनन्या म्हणाली की, “एक अभिनेत्री म्हणून माझ्यावर ट्रोलिंगचा फार काही परिणाम होत नाही. मात्र, लोक ट्रोलिंग करताना विसरून जातात की, कलाकार देखील माणूस आहेत. एक माणूस म्हणून मला देखील बऱ्याच वेळा ट्रोलिंगचा त्रास होता. मात्र, मी जास्त करून होणाऱ्या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करण्याचेच काम करते. जेव्हा कोणी म्हणते की तू हे करू शकते किंवा ते वेगळ्या पद्धतीने करू शकता, तेव्हा मी ते नेहमीच स्वीकारते. मला शिकत राहणे कधीच थांबवायचे नाही. त्यामुळे मी ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही.”
अनेकदा अनन्या तिच्या स्टाइल आणि फॅशनमुळेही ट्रोल झाली आहे. सध्या बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या डेटींगच्या चर्चा रंगल्या आहेत. आदित्य-अनन्याचे व्हेकेशन फोटो व्हायरल झाल्यापासून सगळेच कलाकारांच्या प्रेमसंबंधांवर चर्चा करत आहेत. याशिवाय ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ मधून अनन्या पांडेने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ सह अनन्या ‘खो गये हम कहाँ’ यातही सिद्धांत चतुर्वेदीसोबत झळकणार आहे.