आळेफाटा – अनंत पतसंस्था सशस्त्र दरोडा प्रकरण प्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी भेट देत एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी असे नमूद केले की जिल्ह्याअंतर्गत विविध कुख्यात टोळ्या कार्यरत असून त्यांनी बँकांबरोबरीनेच आता पतसंस्था टार्गेट करणं सुरू केले आहे. अशा टोळ्यांचा तपास विविध पथके नेमून सुरू आहे.
सदर गुन्ह्यातील गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी हँडग्लोजचा वापर करून रोकड लंपास केली आहे. पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग( LCB) बरोबरीनेच हा तपास अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागा ( LCB) ला ही पाचारण करण्यात आलेले आहे. सदर दरोडा घटनेचा सखोल तपास करून लवकरात लवकर गुन्हेगारांना जेरबंद करू असे आश्वासन दिले. यावेळी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, नारायणगाव पोलीस निरिक्षक विलास देशपांडे, अतिरिक्त पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे देखील उपस्थितीत होते.
यावेळी दरोडा दुर्घटनेवेळी दरोडेखोरांनी वापरलेले हेलमेट, गाडी ची नंबर प्लेट,त्यांनी घातलेले कपडे बोरी गावच्या निर्जन परिसरात आढळून आले. त्यामुळे तपासाला चालना मिळण्याची शक्यता व्यक्त होते.
– सोशल मीडियावर अफवांना फुटले पेव
व्हाट्सअप वर सदर गुन्ह्यातील गुन्हेगार भेटले असून पोलिसांच्या टीमचे अभिनंदन अशा प्रकारचा फेक मेसेज सोशल मीडियावर फिरत असून नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरू नये अद्याप दरोडेखोरांचा शोध लागलेला नसून त्यांचा शोध घ्यायचे काम सुरू आहे अशा प्रकारची विनंती वजा सूचना पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. अन्यथा फेक न्यूज पसरविल्याबद्दल सायबर क्राईम कायदांतर्गत सोशल मीडियावर फेक न्यूज पसर्वणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल अशी सक्त ताकीद देण्यात आलेली आहे.