पुणे – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार अण्णा हजारे यांना कुठलाही त्रास होत नसून त्यांना केवळ रुटीन चेकअपसाठी दाखल करण्यात आलंय.
अण्णा हजारे हे दर तीन महिन्यांतून एकदा रुटीन चेकअपसाठी येत असतात, मात्र गेल्या वर्षभरापासून करोना विषाणू महासाथीमुळे अण्णांचे चेकअप लांबणीवर पडले होते. आज अण्णा हजारे हे चेकअपसाठी आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलंय. अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली.
दरम्यान, अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपर्क साधत विचारपूस केली.
याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, “ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली तसेच लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरू आहे. मात्र आज अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळल्यानंतर त्यांनी तातडीने संपर्क साधत अण्णांची विचारपूस केली.