अमृतसर : शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त अमृतसर इएथील इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंटला गुरु नानक देव यांचे नाव देण्याची मागणी संसद सदस्य आणि केंद्रिय अन्न व प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी केली आहे. यासंदर्भात कौर यांनी केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांना एक निवेदन दिले आहे.
पोखरियाल यांच्या हस्ते उद्या अमृतसर येथे इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या अमृतसर शाखेचा भूमीपूजन समारंभ आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने पोखरियाल येथे आले असता, त्यांचे स्वागत करताना कौर यांनी म्हटले आहे की, या संस्थेला श्री गुरु नाक देवजी 550 वी जयंती इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट या नावाने ओळखले जावे.
कौर असेही म्हणाल्या की, ऑल इंडिया इन्स्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या भटींडा येथील संशोधन प्रकल्पाप्रमाणेच ही व्यवस्थापनच्या उच्च शिक्षणाची संस्थाही अल्पावधीत नावारुपाला येईल आणि पंजाबच्या भूमीचे नाव जगभर रोशन करेल. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षानंतर आता पंजाबमध्ये उच्च शिक्षणाच्या उत्तम सुविधा निर्माण होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.