मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अमृता फडणवीसांनी पहिल्यांदाच पंजाबी भाषेत गाणे गायले आहे. त्यांचे हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोलही करण्यात आले आहे.
View this post on Instagram
याच गाण्यावर आता अमृता यांनी रील स्टार रियाझ अली याच्याबरोबर व्हिडीओ बनवला आहे. रियाझ अलीसह या व्हिडीओमध्ये त्या गाण्याची हूक स्टेप करत डान्स करताना दिसत आहेत. अमृता यांचा रियाझ अलीबरोबरचा हा रील व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी अमृता फडणवीसांना ट्रोल करत आहेत. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी अमृता फडणवीसांच्या या रीलवर आक्षेप घेतला आहे.
वृत्त माध्यमांशी बोलतांना अमृता फडणवीसांच्या या रीलबाबत भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रीयाझ अलीबरोबरचा एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. तो रील व्हिडीओ सरकारी बंगल्यात शूट करण्यात आला आहे. अमृता फडणवीसांनी सरकारी बंगल्यात रील बनवण्यासाठी सरकारकडून लेखी अधिकृत परवानगी घेतली होती का? हेदेखील त्यांनी रीलप्रमाणे व्हायरल करावं”. असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.